रात्रीच्या अंधारात रंगला वाळू तस्कर व पोलिसांचा पाठशिवणीचा खेळ….. खेळात पिकअपच्या चालकाचा मृत्यू तर चार जण सुदैवाने बचावले,
महसूलची बघ्याची भुमिका असल्याचा होतोय आरोप
रात्रीच्या अंधारात रंगला वाळू तस्कर व पोलिसांचा पाठशिवणीचा खेळ….. खेळात पिकअपच्या चालकाचा मृत्यू तर चार जण सुदैवाने बचावले
संगमनेर तालुक्यात वाळू तस्करी जोरात, महसूलची बघ्याची भुमिका असल्याचा होतोय आरोप
संगमनेर, ता. २५ ः ( प्रतिनीधी )
तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक परिसरातील विहीरीत पिकअप पडल्याने एकाचा मृत्यू झाला तर चौघे जण बचावले आहेत. ही घटना आज पहाटे चारच्या सुमारास घडली. गोरख नाथा खेमनर (वय २३, राहणार डिग्रस, ता संगमनेर) असे मृत्यू झालेल्या पिकअप चालकाचे नाव आहे. या अपघाताला पिकअपचा पाठलाग करणारी पोलीस पथकाची रात्रगस्तीवरील गाडी जबाबदार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तर विहिरीतून गाडी काढण्यात यश मिळाले असले तरी अद्यापही मृतदेह मात्र मिळालेला नाही.
संगमनेर तालुक्यातील संगमनेर खुर्द, खांडगाव, निमज, धांदरफळ, मंगळापूर याभागातील प्रवरा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा सुरू आहे. तसेच तालुक्याच्या पठार भागातील घारगाव परिसरातील मुळा नदी पात्रालगतच्या अनेक गावांमधून खुलेआम वाळूचा बेकायदेशीर उपसा केला जात आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बेकायदेशीर वाळू उपशाबाबत कठोर भूमिका घेऊनही, महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून संगमनेर तालुक्यातील बेकायदेशीर वाळू उपसा खुलेआम सुरूच आहे. तालुक्यातील महसूल विभागाने डोळ्यावर पट्टी बांधली असल्याने त्यांना तालुक्यात होणारे अवैध गौण खनिज उत्खनन किंवा अवैध वाळू उपशाबाबत महसूलच्या कर्मचाऱ्यांना काहीच माहिती नसते. विशेष म्हणजे गौण खनिज चोरी रोखण्यासाठी रात्री गस्त घालणारे महसूलचे पथकही याबाबत कमालीचे निष्क्रीय असल्याचे वेळोवेळी घडलेल्या अनेक घटनांमधून उघड झाले आहे.
शनिवारी (ता. २५ ) पहाटे चार वाजेच्या दरम्यान धांदरफळ परिसरातील प्रवरा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करून वाळूने भरलेली पिकअप धांदरफळच्या दिशेने खाली होऊन येत असताना जवळा रस्त्यावर एका एस आकाराच्या धोकादायक वळणाच्या बाजूच्या शेतात असलेल्या सुमारे १० परस खोल विहिरीते कठडे तोडून भऱधाव वेगातील पिकअप समोरच्या दिशेने पडली. या गाडीतील चालक वगळता चार कामगार पाठीमागिल बाजूला बसलेले होते. अपघातानंतर ते बाहेरच्या बाजुला असल्याने विहीरीच्या कठड्यातील बांधकामाच्या गजांच्या पायऱ्यांच्या मदतीने बाहेर आल्यान त्यांचा जीव बचावला. मात्र केबीन मधील पिकअप चालक बाहेर येऊ शकला नाही त्यामुळे दुर्दैवाने त्याचा बुडाल्याने जागीच मृत्यू झाला. दरम्यान याबाबत स्थानिक ग्रामस्थांना माहिती समजताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. काही ग्रामस्थांनी या घटनेची माहिती तालुका पोलिसांना दिली. ही माहिती समजताच तालुका पोलीस ठाण्याचे काही कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली. ज्या विहिरीमध्ये पिकअप पडली आहे ती विहीर अतिशय खोल असून पूर्ण पाण्याने भरलेले आहे. विहिरीत पाणी जास्त प्रमाणात असल्याने पिकअप गाडी बाहेर काढण्यासाठी अपयश येत होते. शनिवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पोलिसांच्या अथक परिश्रमाला यश येऊन विहीरीत पडलेली पिकअप बाहेर काढण्यात यश मिळाले.
——————————————————–
तीन वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा
तीन वर्षांपूर्वी एक प्रशासकीय अधिकारी वाळूच्या गाडीचा पाठलाग करीत असताना तिघांचा निळवंडे कालव्यासाठी खोदलेल्या कालव्याच्या खोल चरामध्ये वाहनासह पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आताही त्याच घटनेची पुनरावृत्ती झाल्याची खमंग चर्चा सुरु असून, रात्र गस्तीवरील पोलिसांच्या वाहनाने केलेला पाठलाग चुकवण्याच्या नादात पिकअप विहिरीत पडल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. मात्र पाठलाग करणारे वाहन महसूलच्या पथकाचे असल्याची चर्चाही परिसरात सुरु असल्याने, या अपघाताला कारणीभुत असलेल्या वाहनाची निश्चिती कऱण्याची आवश्यकता आहे.
अवैध वाळू तस्करी करणाऱ्या पिकअपला हेडलाईट नसल्याची चर्चाही घटनास्थळी सुरु होती. पाठलाग चुकवण्यासाठी धारण केलेला वेग आणि भरधाव वेगातील वाहनाला दिवे नसल्याने हा अपघात झाल्याची उलटसुलट चर्चा सुरु होती. संगमनेर तालुक्यात वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या अनेक बेकायदेशीर वाहनांचे पेव फुटले आहे. अनेक वाहनांना कागदपत्रेही नाहीत. वाळु तस्करीतून मिळणाऱ्या मलिद्यामुळे वाट्टेल तो धोका पत्करुन बेदरकारपणे सुरु असलेली वाळूचोरी महसूल प्रशासनाचा नाकर्तेपणा उघड करणारी असून अनेक छोट्या मोठ्या अपघातांना कारणीभुत ठरली आहे.