ब्रेकिंग न्युजसंपादकीय

” वर्दीतील माणसाचे दर्शन…”

एक सायकल लेकीसाठी....पोलिसांचा असाही एक सामाजिक उपक्रम....

” वर्दीतील माणसाचे दर्शन…”

एक सायकल लेकीसाठी….पोलिसांचा असाही एक सामाजिक उपक्रम….

पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी वर्दीतील सुहृदय पित्याचे दर्शन घडवत ‘एक सायकल लेकीसाठी’ या अनोख्या उपक्रमातून दिला सामाजिक संदेश

संगमनेर, ता. १३ ः ( प्रतिनिधी )
गणेशोत्सवाच्या काळात शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी गणेश मंडळे व सामाजिक संस्थाना एक सायकल गरजू लेकीसाठी देऊन सामाजिक दातृत्वाचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला मिळालेल्या प्रतिसादातून लायन्स सफायर संगमनेर यांच्या सहकार्याने तसेच प्राणी मित्र संघटना भूषण नरवडे यांच्या मदतीने मालपाणी लॉन्स येथे पोलीस अधीक्षक राकेश ओला, श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर , उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात २५ गरजू विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक राकेश ओला म्हणाले की, पोलिस निरीक्षक मथुरे यांनी अनोख्या उपक्रमातून पोलिसांमधील सामाजिक दातृत्व व वर्दीतील माणसाचे दर्शन घडविले आहे. मुलींचे शिक्षण महत्वाचे आहे त्यासाठी राज्य व केंद्र सरकार वेगवेगळे उपक्रम राबवीत असतात. या सामाजिक उपक्रमातून एक चांगला संदेश समाजात जाईल. यात सहभागी झालेल्या संगमनेरकरांचे अभिनंदन करताना, आपल्या काही अडीअडचणी असतील तर आम्हाला सांगा. आमच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक आपल्या मदतीसाठी उपलब्ध सदैव उपलब्ध आहेत. तसेच यापूढे १०० सायकल वाटप कार्यक्रम राबवून गरजू मुलींना मदत करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या उपक्रमांतर्गत सायकल भेट मिळालेल्या सावित्रीच्या लेकींनी या अनोख्या भेटीबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी पद्मश्री रेघाटे हिने मिळालेली सायकल हे आमच्या आयुष्याला कल देणारे गिफ्ट असल्याचे सांगितले. या उपक्रमासाठी मथुरे यांनी स्वःत पुढाकार घेऊन सुरुवात केल्यानंतर शहरातील सामाजिक संस्था, कार्यकर्त्यांनी यात सक्रीय सहभाग घेतला. या कार्यक्रमास सौ. सुनीता मालपाणी, भूषण नरवडे, बाळासाहेब देशमाने, अतुल अभंग, सुदीप हासे, कल्याण कासट, श्रीनिवास भंडारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक कल्पेश दाभाडे, पोलीस उपनिरीक्षक सुनील माळी, निवांत जाधव, विठ्ठल पवार आदींनी परिश्रम घेतले.

पोलीस निरीक्षक मथुरे ः
गणेशोत्सव शांतता कमिटीच्या बैठकीत आवाहन केले होते. “एक सायकल लेकीसाठी” त्यानंतर भूषण नरवडे याने मोलाचा प्रतिसाद दिल्यानंतर लायन्स क्लब सफायरच्या मदतीने सायकली मिळाल्या. गरजू मुलींचा शोध घेऊन त्यांना सायकल दिल्याचे मनस्वी समाधान लाभले आहे. या उपक्रमासाठी प्रतिसाद देणाऱ्या सर्व सुहृदांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.

गणेश मंडळांना वारंवार आवाहन करूनही त्यांनी या सामाजिक उपक्रमाकडे पाठ फिरविल्याचे चित्र पहायला मिळाले. गणेशोत्सव सामाजिक एकोपा, सामाजिक बांधिलकीचा उत्सव आहे. मात्र गणेश मंडळाना त्याचा विसर पडला असून अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमातही गणेश मंडळांनी हिरीरीने सहभागी व्हायला हवे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

adminuniquemarathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!