दुधगंगेचा आरोपी “त्या” डाळींब बागेतील झोपडीत..?
संगमनेर दि 19 प्रतिनिधी
दूधगंगेच्या कोट्यावधीच्या अपहार प्रकरणी फरार असलेला मुख्य सूत्रधार आरोपी अनेक महिने उलटून गेले तरी देखील पोलिसांना सापडेना ही मोठी शोकांतिका असून गोरगरीबांच्या कष्टाचे पैश्याचा अपहार करणारे आरोपी नेमके कुठे? हाच प्रश्न त्या बँकेतील गोरगरीब ठेवीदार पोट तिडकीने विचारत आहे. तर हा मुख्य आरोपी संगमनेर तालुक्यातीलच दुष्काळी पट्ट्यात असणाऱ्या चौदा ते पंधरा एकर डाळींबाच्या बागेत आश्रयास असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजले आहे. त्यामुळे हाताखाली असून देखील कायद्याचे हात मुख्य आरोप पर्यंत कसे पोहचत नाही. हा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरातील नावाजलेल्या आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची कामधेनू म्हणून ओळख असणाऱ्या दूधगंगा पतसंस्थेमध्ये तब्बल 80 कोटी 79 लाख 41 हजार 981 रुपयांचा आर्थिक अपहार झाला. याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष व माजी जि प सदस्य भाऊसाहेब कुटे, व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ यांच्यासह एकूण 21 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनेक महिने उलटून गेले. काही आरोपींना अटक झाली. यातील काहींना जामीन देखील झाला. मात्र यातील मुख्य आरोपी अजून देखील फरार आहे. यामध्ये तपास यंत्रणा मंदावली की थांबली असा प्रश्न ठेवीदारांना पडला आहे.
दरम्यानच्या काळात ठेवीदारांनी ठेवी परत मिळण्यासाठी आंदोलन केले. अनेक मंत्र्यांचे उंबरठे झिजवले मात्र त्यांना अद्यापही न्याय मिळालेला नाही. यातील काही आरोपींचा थेट संगमनेर शहरातही वावर असल्याचे अनेकांनी पाहिले आहे.
तर यातील काही मुख्य आरोपी तालुक्यातीलच एका गावामध्ये डाळिंबाच्या बागेत असलेल्या झोपडीत वास्तव्य करत असून झोपडी शेजारी एक बंगला ही असल्याचे गावातील काही नागरिकांनी पाहिल्याने या गोष्टीची चर्चा सुरू झाली आहे.