आर्थिकब्रेकिंग न्युज
चारित्र्यसंपन्न पिढी घडवण्याचे कार्य शिक्षकांनी करावे : विजय चौधरी
इनर व्हील राष्ट्रबांधणीचे शिल्पकार पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.
इनर व्हील राष्ट्रबांधणीचे शिल्पकार पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.
चारित्र्यसंपन्न पिढी घडवण्याचे कार्य शिक्षकांनी करावे : विजय चौधरी
संगमनेर ( दि. २१ , प्रतिनिधी )
राष्ट्राच्या उभारणीत ज्ञानदान करणाऱ्या
शिक्षकांचे मोठे योगदान आहे म्हणूनच चारित्र्यसंपन्न पिढी निर्माण करण्याचे काम शिक्षकांनी करावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य नगर विकास मंत्रालयाचे उपसचिव विजय चौधरी यांनी केले.
इनर व्हील क्लब ऑफ संगमनेर तर्फे जिल्ह्यातील ३९ शिक्षकांना इनर व्हील राष्ट्रबांधणीचे शिल्पकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्या प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इनर व्हील क्लबच्या प्रेसिडेंट सुनिता गाडे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आ.डॉ. सुधीर तांबे , माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, ओम मयूर ज्वेलर्सचे संचालक सामजिक कार्यकर्ते महेश मयूर, वैशाली मयूर , इनरव्हील सचिव शिल्पा नावंदर उपस्थित होत्या.
आपल्या अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी भाषणात विजय चौधरी पुढे म्हणाले की, शिक्षण हा समृद्धीचा अलंकार आहे. जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलविते ते शिक्षण होय. शिक्षक, विद्यार्थी व पालक या समभुज त्रिकोणाचे नाते समृद्ध राहिल्यास राष्ट्राची बांधणी होईल. सद्यस्थितीत जागतिक पातळीवरील अनेक अर्थव्यवस्था ढवळून निघत आहेत, या स्पर्धेत आपला विद्यार्थी टिकला पाहिजे अशाच पद्धतीने शिक्षकांनी विद्यार्थी घडविले पाहिजे. अज्ञान, अंधकार आणि मोगलांच्या अनन्वित अत्याचारातुन महाराष्ट्राला हिंदवी स्वराज्याची दिशा देणाऱ्या छत्रपती शिवरायांना मातोश्री जिजाऊंनी केवळ आई म्हणूनच नव्हे तर त्यांचे गुरु म्हणून घडवले हीच भूमिका शिक्षकाला निभवावी लागेल. सामाजिक, राजकीय व धार्मिक दृष्ट्या उदार व सहिष्णु असणाऱ्या शिवरायांच्या चरित्राचा आदर्श शिक्षकांनी घेतल्यास सामर्थ्य संपन्न राष्ट्राची निर्मिती होईल असेही ते म्हणाले.
आपल्या प्रास्ताविक भाषणात प्रकल्प प्रमुख वृषाली कडलग यांनी कार्यक्रमाचा हेतू विषद केला. आंतरराष्ट्रीय पातळीवर सामाजिक काम करणाऱ्या क्लब कडून शिक्षकांचा सन्मान होणे ही महत्त्वपूर्ण बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रेसिडेंट सुनिता गाडे यांनी क्लबच्या कार्याचा आढावा सादर केला.
आपल्या भाषणात माजी आ. डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, राष्ट्राचा विकास खऱ्या अर्थाने करायचा असेल तर शिक्षण हा सर्वोच्च प्राधान्याचा विषय असायला हवा. मराठी माध्यमाच्या व जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था भौतिकदृष्ट्या ही समृद्ध करणे ही शासनाची जबाबदारी आहे.
मात्र दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. विज्ञान व तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. याप्रसंगी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, वैशाली मयूर यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी मच्छिंद्र ढोकरे, निलेश देशमुख, विलास साळुंखे, अविनाश बोधक, संतोष झावरे, भास्कर तातळे, पोपट ढोंन्नर, दादाभाऊ जोशी, शिवाजी तिकांडे, शिवाजीराव कराड, किरण बांडे, मंजुळा शिंदे, मनीषा शिंपी, बाबाजी मुंडे, संतोष वाघमोडे, छाया शिंदे, शुभांगी भालेकर, सविता मुंडे, अंजली मुळे, नतिभा साठे, शोभा लांडगे, अर्चना महानोर , पोपट घुले, मंगल शेळके, मंगल शिंदे, संजीवनी दौंड, प्रमोदिनी शेलार, संगीता खोमणे,साईलता सामलेटी, मीना वाघ , बाळू जरांडे , सुवर्णा लहिरे, उत्तम पवार , ज्योत्स्ना खोजे या शिक्षकांना राष्ट्रबांधणीचे शिल्पकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी वैशाली खैरनार, नेहा सराफ, प्रीती फटांगरे , सुनील घुले, सुनील कडलग
आदी उपस्थित होते.
अत्यंत आनंदात व उत्साहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता गुणे यांनी केले तर शिल्पा नावंदर यांनी आभार मानले.