मनोरंजनसंपादकीय

प्रासंगिक ः मरणकळा….

मरणाने केली सुटका... जगण्याने छळले होते....

संगमनेर ( प्रतिनिधी ) ः सकाळीच शहर पोलिसांनी शहरातील सर्व प्रसारमाध्यमांवर एक फोटो टाकला… शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गजबजलेल्या बस स्थानकात एका अज्ञात भिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती आणि फोटो टाकून ओळख पटवण्याचं आवाहन केलं होतं. सकृतदर्शनी अत्यंत सर्वसामान्य असलेली ही घटना असली तरी मरण या कोणालाही न चुकणाऱ्या घटकाची आहे.
                             देशातल्या सर्व महानगरांसह धार्मिक ठिकाणी गेल्या काही वर्षात भिकाऱ्यांची संख्या अमर्याद वाढली आहे. कुठून येतात ही माणसं  ?  तुमच्या आमच्या सारखी, आपल्याच कुटूंबातली वाटावी अशी वृध्द, अनेकविध आजारांनी जर्जर झालेली, सुतकी चेहऱ्यावरची मरणकळा लपवण्याचा प्रयत्न करीत जगण्यासाठी खाण्याचा संघर्ष करणारी, लाखो तुसड्या, नकोशा नजरांचा नाईलाजानं सामना करणारी ही माणसं, त्यात स्त्रीया, पुरुष, लहानगी मुलं, तुटक्या हातापायाची, सडलेल्या जखमा अंगाखांद्यावर वागवणारी ओंगळवाण्या चेहऱ्याची किंवा बिनचेहऱ्याची ही माणसं… अक्षरशः लाखोंच्या संख्येनं समाजात वावरत असतात. धार्मिक ठिकाणं, सार्वजनिक बागा, बसस्थानके, रेल्वेस्थानकांच्या परिसरात यांचं वास्तव्य असतं. यांचं ओंगळवाणं दर्शनही कोणाला नकोसं असताना केविलवाणे चेहरे करुन त्यांचं पैसे मागण्यासाठी अंगचटीला येणं साहजिकच चिड निर्माण करतं. समाजाची हाडतुड सहन करणारी ही माणसं, रस्त्यावरचं जीणं जगत असतात, मिळेल ते शिळंपाकं, दुसऱ्याच्या दयेवर जगतात, मरण येईपर्यंत जीवंत राहण्यासाठी, पोटाची खळगी भरण्यासाठी धडपडतात, पराजीत होतात, पुन्हा नव्या उभारीनं पुढं सरसावतात…..
या माणसांचीही एखादी बाजू असेलच ना… ती कोणी समजावून घेण्याचा प्रयत्न मात्र करताना दिसत नाही. ज्येष्ठ नागरिकांची संज्ञा लाभलेली ही माणसं कोणत्या तरी घरातील असतील ना… त्यांनाही मुलं बाळं, सुना, नातवंडं, आई, बाप, भाऊ बहिणी असतील, त्यांनाही नांदत्या घरात सुखा समाधानानं जगायचं असेल. मात्र नियतीने त्यांच्यापुढं वाढून ठेवलेलं ताट त्यांना तसं जगू देत नाही. कधी खाष्ट सासवा, सुनांमुळं घरातल्या भांडणाला त्रासून घर सोडणाऱ्या, तर कधी मुलानं कुटूंबात ओझं होणारी, अडगळ ठरणारी ज्येष्ठ माणसं धार्मिक स्थळाच्या ठिकाणी नेऊन सोडल्याच्या घटनाही यामागे असतात. दिशाहीन आयुष्य जगणारी ही माणसं मग आयुष्य असेपर्यंत जगण्यासाठी भिक मागतात. मिळालेल्या अन्न व पैशातून आपल्या गरजा भागवण्याचा प्रयत्न करतात. हळूहळू हे जगणही त्यांच्या अंगवळणी पडतं. हिडीस फिडीस करणाऱ्यांना ” कन्व्हीन्स ” करण्याचं कसब अंगी येतं. काही शेतकरी कुटूंबातले, सर्वसामान्य खेड्यापाड्यातलं वयोवृध्द असेच घरादाराला पारखे होतात. गळ्यात तुळशीमाळ, कपाळाला गंध बुक्का, हातात भगवी पताका, टाळ घेवून पांडुरंगाच्या नावानं आणा पैसा मागत पंढरपूराकडे प्रस्थान करतात. चंद्रभागेतिरी मरण येण्याची वाट पाहतात. तिर्थस्थळाच्या ठिकाणी अल्पपैशात मिळणारे भोजन किंवा भाविकांच्या दानधर्मावर जगतात. संगमनेरातही दत्त मंदीर, बसस्थानक परिसरात असंख्य भिकाऱ्यांचे वास्तव्य आहे. अत्याधुनिक बसस्थानकाच्या प्रवेशद्वारात त्यांच्या पथाऱ्या पडलेल्या असतात. त्यांचा रोगट संसार सर्वत्र पसरलेला असतो. त्यांच्या जोडीला असतात हातात परड्या घेतलेल्या महिला, कडेवर ओंगळवाणी लेकरं घेऊन पैशासाठी हात पसरणाऱ्या परप्रांतीय तरण्या युवती, दहा बारा वर्षांची केसाच्या झिंज्या झालेली पोरं सोरं…. सारं नकोसं वाटणारं तरीही न टाळता येणारं असं दृष्य सर्वांच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग झालयं.
परराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यासह सर्व सुविधा मोफत पुरवल्या जाण्याचा कायदा आहे. ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. करीअर व धावपळीच्या आयुष्यात घरातल्या जेष्ठांचा ताण कुटूंबियांवर पडायला नको याची अत्यंत उत्तम सुविधा त्यांनी केलीय. आपल्याकडे मात्र सर्वपक्षीय राज्यकर्त्यांचं याबाबत म्हणावं असं धोरण नाही. धार्मिकतेचा रंग देत ज्येष्ठांना एसटीच्या प्रवासात दिलेल्या सवलतीमुळं महिला व ज्येष्ठांचा प्रवास मात्र वाढलाय. या घरदारापासून वंचित, दुर्लक्षीत घटकाचं कुठंतरी पुनर्वसन करावं, त्यांच्यासाठी वृध्दाश्रम उघडावेत, त्यांच्या आजारात मोफत उपचाराच्या सुविधा मिळाव्यात जेणेकरुन त्यांचं जगणं काहीसं सुसह्य होईल याकडं लक्षं द्यायला हवं आहे. सार्वजनिक स्वच्छता करण्याचा इव्हेंट करणाऱ्या सामाजिक व राजकिय संघटनाही यासाठी पुढं सरसावल्या पाहीजेत. मात्र दुर्दैवानं तसं होताना दिसत नाही. मग असाच एखाद्या दिवशी मृत्यू  होतो. बेवारस म्हणून त्याची ओळख पटवण्यासाठी धडपडणाऱ्या संस्था प्रयत्न थकले की, अंत्यसंस्कार उरकतात. एक जीव जगाच्या लोकसंख्येतून वजा होतो इतकचं…. खरं तर कोणीही कितीही मोठा का असेना मृत्यू होण्यापूर्वीच त्याच्या नावाला स्वतंत्र ओळख असते. त्याच्या मृत्यूनंतर स्मशानात हातातल्या मोबाईलवर गेम खेळत, रिल्स पाहत किंवा चॅटींग करीत मनोरंजनाच्या आभासी विश्वात रमलेली माणसं मृत माणसाची नव्हे तर केवळ ” बॉडीची ” वाट पाहतात. त्याची ओळख केवळ ” बॉडी ” या दोन अक्षरांपुरतीच मर्यादीत होते…. याची त्या मृतात्म्याला जाणीवही नसते. अशा वेळी कवीवर्य सुरेश भटांची ” इतकेच मला जाताना सरणावर कळले होते… मरणानं केली सुटका जगण्याने छळले होते ” या ओळी न कळत आठवतात.
———————–
आनंद गायकवाड 18.2.2024
adminuniquemarathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!