ब्रेकिंग न्युजमनोरंजन
मंदिरे हीच खरे ज्ञानपिठ व विद्यापीठ ः महंत भास्करगिरी महाराज
डेरे परिवाराच्या संकल्पनेतील कऱ्हे घाटातील भव्य मंदिरासह भक्ती शक्ती शिल्प ठरतेय प्रवाशांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू
मंदिरे हीच खरे ज्ञानपिठ व विद्यापीठ ः महंत भास्करगिरी महाराज
संगमनेर ( प्रतिनिधी ) ः
हिंदू धर्मिय समाजासाठी खऱ्या अर्थाने काम करताना त्यांच्या अडी अडचणी सोडवणारे अभावानेचे आढळतात. मंदिरे ही खऱ्या अर्थाने ज्ञानपीठ व विद्यापिठ असल्याने या ज्ञानमंदिरातून संस्कारांचे पाठ मिळतात असे गौरोवोद्गार देवगड देवस्थान मंदिर ट्रस्टचे महंत भास्करगिरी महाराज यांनी काढले. तालुक्यातील कऱ्हे घाटाच्या रमणिय निसर्गसुंदर परिसराच्या सौंदर्यात भर टाकणारे अप्रतिम मंदिर, गोपूर शैलीचे प्रवेशद्वार व मंदिराच्या प्रांगणात चित्तवेधक भक्ती शक्ती या समूहशिल्पाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
ते म्हणाले, विद्यमान केंद्र शासन व साधुसंतांच्या कृपाशीर्वादामुळे अयोध्येत भव्य असे प्रभु श्रीरामलल्लांचे मंदीर साकारले आहे. या मंदिराच्या निर्मीतीमुळे पाचशे वर्षांचा कलंक पुसला गेला ही समस्त हिंदू समाजासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. मंगल, दिव्य व रमणिय अशा तत्वांचा प्रत्यय मंदिर या वास्तूतून येतो. अयोध्येतील राममंदिरामुळे केवळ धर्मच वाढीला लागेल असे नव्हे तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मीतीला चालना मिळणार आहे. संगमनेर तालुक्यातील या मंदिराच्या रुपाने डेरे परिवाराच्या डॉ.भानुदास डेरे यांनी संस्कारांचा डेरा निर्मिला आहे. तसेच सोबतच्या रुग्णालयातील रुग्णसेवा हीतर साक्षात परमेश्वराची पूजाच आहे. धार्मिक बाबतीत आपण बेसावध राहिलो मात्र, श्रध्देची जिवंत प्रतिके असलेली श्रध्दा मात्र कोणालाही तोडता आली नाही. आपल्या आजूबाजूला भ्रुणहत्या, गोहत्या वाढत असल्याच्या पार्श्वभुमिवर प्रत्येकाने सावधगिरी बाळगण्याचा सल्लाही त्यांनी दिला. तसेच समाजातील दुःख, वेदना नष्ट होऊन सर्वांना समाधान लाभावे अशा सदिच्छाही त्यांनी व्यक्त केल्या.
हिंदुत्ववादी नेते सुरेश चव्हाणके म्हणाले, सध्या हिंदू बांधव मंदिराला विसरत चालला असल्यामुळे हल्ली मंदिर बांधणारे भेटत नाहीत. काही विघ्नसंतोषी घटकांनी राजे रजवाड्यांचे महाल नव्हे तर, धर्माची शक्ती केंद्रे असलेली, धर्माच्या व्यवस्थेचे काम करणारी, अध्यात्मिक संदेश देणारी मंदिरे उध्वस्त केली. आता देव आणी संत विविध जाती धर्मांमध्ये वाटून घेतले आहेत. या पार्श्वभुमिवर हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी, आत्महत्या थांबवण्यासाठी हिंदू समाज बांधवांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे, डॉ. संजय मालपाणी, प्रा. सोपानराव देशमुख, हभप. उद्धव महाराज मंडलिक आदींनी मनोगत व्यक्त केले. तर उद्धव महाराज सूर्यवंशी यांनी कीर्तनातून उपस्थितांचे प्रबोधन केले.
संगम सेवाभावी ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. भानुदास डेरे, भाजपाचे नेते अॅड. श्रीराज डेरे यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील कऱ्हे घाटातील या अप्रतिम बांधकामाच्या मंदिरात विठ्ठल रुख्मिणी, श्री दत्तात्रेय, व भगवान शिवाच्या मूर्त्यांची यज्ञ, यागादी मंत्रोच्चाराने प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या कार्यक्रमासाठी कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनाताई विखे, आचार्य महामंडलेश्वर डॉ. रामकृष्णदास महाराज लहवीतकर, आळंदीच्या जोग वारकरी शिक्षण संस्थेचे उद्धव महाराज मंडलिक सूर्यवंशी, नारायण महाराज जाधव, महंत डॉ. रत्नाकर पवार, योगी केशवगिरी महाराज, गीता परिवाराचे अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, डॉ. श्रीराज डेरे, अंकिता डेरे, डॉ. जगदीश वाबळे, डॉ. एकता वाबळे, दिपक महाराज देशमुख, सुनील महाराज मंगळापुरकर, सुदाम महाराज कोकणे, सखाराम महाराज तांगडे, राम महाराज पवळकर आदींसह मोठ्या संख्येने भाविक भक्त व विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन पोपट महाराज आगलावे यांनी केले, स्वागत संगम सेवाभावी ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. भानुदास डेरे यांनी केले तर आभार ॲड. श्रीराज भानुदास डेरे यांनी मानले.
ः मंदिराच्या प्रांगणात शक्तीचे प्रतिक छत्रपती शिवाजी महाराज व भक्तीचे प्रतिक जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या भेटीचे भव्य शिल्प, या मध्यवर्ती शिल्पाच्या एका बाजूला वारकरी तर दुसऱ्या बाजूला धारकऱ्यांचे फायबर या माध्यमात साकारलेले भव्य समूहशिल्प लक्ष्यवेधी ठरले आहे.