संगमनेर तालुक्यात दोन “मुन्नाभाई”?
अनेक रुग्णांच्या जीवाशी खेळ ; प्रशासनाचे दुर्लक्ष
संगमनेर दि 2
तालुक्यातील अनेक गावांमध्ये बोगस डॉक्टर गोरगरीब रुग्णांची तपासणी करून त्यांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनेक वर्ष संगमनेर शहरात मोठ्या रुग्णालयात प्रतिष्ठित डॉक्टरांच्या हाताखाली काम करून थेट ग्रामीण भागात काही मुन्नाभाईंनी दवाखाना थाटून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे.
सर्वसामान्य आणि अत्यंत गरीब कुटुंबातील रुग्णांना मोठ्या रुग्णालयात उपचार घेणे परवडत नसल्याने हे रुग्ण जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतात. मात्र तालुक्यात अनेक जण वैद्यकीय शिक्षण न घेता प्रमाणपत्र नसताना देखील वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे समोर आले आहे. यामुळे अनेकांच्या जीवाशी हे बोगस डॉक्टर खेळत असल्याचे समोर आले आहे. हे बोगस डॉक्टर अपूर्ण माहितीच्या आधारावर रुग्णांना औषधे देत असल्याने यामुळे अनेकांना गंभीर आजारांचा देखील सामना करावा लागला आहे. बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा आणि तालुकास्तरीय पुनर्विलोकन समिती स्थापन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या समितीच्या कुठल्याही बैठका वेळेवर होत नसल्याचे बोलले जाते. तर काहींनी बोगस वैद्यकीय सेवेतून मोठी माया गोळा केली आहे.
संगमनेर तालुक्यातही काही ठिकाणी अजूनही बोगस डॉक्टर कार्यरत आहेत. गरीब रुग्णांना इंजेक्शन आणि सलाईनचा डोस देत प्रत्येकी एक ते दीड हजार रुपये घेऊन त्यांची लूट करत आहेत. संगमनेर तालुक्यातील जोर्वे आणि जवळेकडलग गावात दोन मुन्नाभाई हे रुग्णांच्या आरोग्याची खेळ खेळत असल्याची माहिती खात्रीलायक माहिती समोर आली आहे. अनेक वर्ष संगमनेर शहरात प्रतिष्ठित डॉक्टरांच्या हाताखाली काही वर्ष काम करून त्यांनी थेट ग्रामीण भागात जाऊन दवाखाना थाटला आणि नागरिकांच्या आरोग्याची खेळ मांडला असल्याचे वास्तव समोर आल्याचे काही नागरिकांनी सांगितले आहे. त्यामुळे आता यांच्यावर कारवाई कधी होणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.
Good