महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी महिलांसाठी सुरू केला “महिला कक्ष”….
खऱ्या अर्थाने साजरा झाला महिला सन्मान...
महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी महिलांसाठी सुरू केला “महिला कक्ष”….
संगमनेर(प्रतिनिधी)-
अनेक पोलीस अधिकारी आले अन गेले परंतु महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी प्रसाधन गृहाची समस्या कोणीही गांभीर्याने घेतली नाही. परंतु पितृत्व, दातृत्व भावना असलेल्या शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी महिला दिनाचे औचित्य साधून तयार केलेल्या महिला विश्रांतीगृह व प्रसाधनगृह असलेला महिला कक्ष महिला पोलिसांसाठी खुला करून, खऱ्या अर्थाने महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या भावना व समस्यांचा विचार करून महिलांचा सन्मानच केला.
संगमनेर शहरारील तहसील कार्यालयाच्या इमारतीत शहर पोलीस ठाणे आहे. तालुक्यातुन अनेक महिला शासकीय कामानिमित्त तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यात येत असतात. तहसील कार्यालयातील प्रसाधन गृहाची अवस्था अत्यंत बिकट अशी आहे. तेथे घाणीचे साम्राज्य असून सतत पाण्याचा तुटवडा असतो. कामानिमित्त आलेल्या नागरिकांना त्याच्या नैसर्गिक विधीसाठी स्वच्छ प्रसाधनगृह अत्यंत गरजेचे असताना तहसील कार्यालयातील प्रसाधनगृह असून नसल्यासारखे आहे. उलट तेथील दुर्गंधीने तेथे वावरणारे कर्मचारी व कामानिमित्त आलेल्या नागरिकांना नाका तोंडाला रुमाल लावून वावरावे लागते. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दिवसपाळी व रात्रपाळीवर कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रसाधन गृहाचा प्रश्न जटिल बनला होता. त्यांना त्यांचे नैसर्गिक विधी थेट घरी जाऊनच उरकावे लागत असे. त्यामुळे महिला पोलिसांना सुलभ प्रसाधन गृहाअभावी अनेक आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते.
शहर पोलीस ठाण्यात अनेक पोलीस अधिकारी आले अन बदली होऊन गेलेत परंतु आपल्या स्टाफच्या महिला कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या या महत्वपूर्ण प्रश्नाची कोणीही गांभीर्याने दखल घेतली नाही. परंतु पितृत्व व दातृत्वाच्या उपजतच अंगी भावना असलेल्या पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी महिला कर्मचाऱ्यांच्या या समस्येला गांभीर्याने घेऊन प्राधान्य देत शहर पोलीस ठाण्याच्या आवारात महिलांना विश्रांतीसाठी प्रसाधनगृह असलेला स्वतंत्र “महिला कक्ष” बांधून या कक्षाचे आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस महिला कर्मचाऱ्यांच्या हाती या महिला कक्षाच्या चाव्या सोपवल्या.
या कक्षात महिलांसाठी स्वतंत्र प्रसाधन गृहाची तसेच त्यांना काहीवेळ विश्रांतीसाठीची सोय केली आहे. या कक्षाच्या वरती स्वतंत्र अशी पाण्याच्या टाकीची व्यवस्था करण्यात आली आहे.
यावेळी शहर पोलीस ठाण्याच्या महिला कर्मचाऱ्यांनी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचे आभार मानत अनेक वर्षांच्या असलेल्या समस्येचे निराकरण झाल्याचा आनंद व्यक्त केला.
साहेब आता तहसील कार्यालयाच्या इमारतीमधील स्वच्छता गृहाकडे ही लक्ष द्या…..
तहसील कार्यालयातील स्वच्छतागृहाची अवस्था असून अडचण नसून खोळंबा असल्यासारखी असून तालुक्यातील अनेक नागरिक कामानिमित्त इथे येत असतात. नैसर्गिक विधींना कुणीही अडवू शकत नाही. त्यामुळे नाईलाजाने अस्वच्छतेसह दुर्गंधीचा सामना करत तेथील स्वच्छतागृहात तोंडाला अक्षरशः रुमाल लावून जावे लागते. तसेच तिथे आसपास वावरणाऱ्या कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना देखील या दुर्गंधीच्या समस्येला नाईलाजास्तव तोंड दयावे लागते. तेथे पाण्याचा सतत तुटवडा असल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पोलीस निरीक्षक साहेबांनी औदार्य दाखवून महिला पोलीस कर्मचाऱ्यांची सोय केली. तसेच गांभीर्य तहसीलदार कार्यालयाचे प्रमुख असलेले तहसीलदार साहेबांनी दाखवून तेथील स्वच्छता गृहाची समस्या सोडवावी अशी मागणी होत आहे.