Uncategorized
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त आशा सेविका सन्मान कार्यक्रम साजरा…
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त आशा सेविका सन्मान कार्यक्रम साजरा…
संगमनेर/प्रतिनिधी -:
जागतिक महिला दिनानिमित्त मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये महिला सन्मान कार्यक्रम आयोजित करून संगमनेर तालुक्यातील आशा सेविका आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून परफेक्ट फाऊंडेशनच्या संस्थापिका सौ. सुनीता कोडे, संगमनेर वकील संघाच्या उपाध्यक्ष सौ. माया पवार, माजी नगरसेविका सौ. रुपाली औटी, पत्रकार निलिमा घाडगे, मानवी हक्क आयोग जिल्हाअध्यक्ष बानोबी शेख उपस्थित होत्या.
या कार्यक्रम प्रसंगी सुनिता कोडे यांनी महिलांना आजच्या काळात सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे अतिशय गरजेचे आहे. कारण प्रत्येक ठिकाणी महिलेवर टीका करणारे खूप जण असतात त्यांना उत्तर देण्याऐवजी आपले उत्तम काम करत राहावे आणि आपल्या कामात उंच भरारी घ्यावी असे मनोगत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
मेडिकव्हर हॉस्पिटलच्या डॉ.दिव्या पटेकर हिमाटोलॉजिस्ट यांनी स्त्रियांना होणारे आजार यात ॲनिमिया आणि क्षयरोग यांची माहिती दिली तसेच स्त्रियांनी स्वतःकडे लक्ष देणे गरजेचे असून वेळेवर तपासणी करून उपचार घेण्याचा सल्ला दिला.
यावेळी ऍड.माया पवार यांनी महिलांना कायदे समजून घ्या आणि समाजात जागृती निर्माण करा तसेच महिलांनीच सकारात्मक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे असे सांगितले. त्याचबरोबर महिला कायद्यांचा दुरुपयोग होत असल्याची खंत देखील व्यक्त करत महिला कायदे फक्त ज्या ठिकाणी अन्याय होतो तेथेच वापरले पाहिजे असे मत व्यक्त केले.
यानंतर मेडिकव्हर हॉस्पिटलच्या आहारतज्ञ तेजल पारगी यांनी स्त्रियांनी संतुलित आहार वेळेवर घेतला तर स्त्री सक्षम व निरोगी आयुष्य जगू शकते असे सांगितले.
जागतिक महिला दिनानिमित्त मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये आशा सेवकांची तपासणी यामध्ये रक्तातील (CBC, Lipid Profile,Urine, Creatinine, BSR,) X-ray ,ECG सह डॉक्टरांकडे मोफत तपासणी 31 मार्चपर्यंत करण्यात येणार आहे अशी माहिती मेडिकव्हर हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख नमन यादव यांनी दिली.
नागरिक व आरोग्य प्रशासन यांच्यामधील फ्रंट लाईन म्हणून काम करणारे सर्व आशा सेविका यांच्या स्वास्थ्यासाठी व त्यांच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन वाढावा यासाठी आजच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी संगमनेर शहर व तालुक्यातील अशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रियंका घोरपडे मानव संसाधन विभाग मेडिकव्हर हॉस्पिटल यांनी केले.
याप्रसंगी मेडिकव्हर हॉस्पिटलच्या केतकी बंडावणे, नर्सिंग प्रशिक्षक प्रियंका राजपूत, पॅथॉलॉजिस्ट डॉ. वैशाली रसाळ, संपर्कप्रमुख संतोष गोडसे, आशा सेविका, नर्सिंग स्टाफ आणि मार्केटिंग टीम व मेडिकव्हर हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होता.