संगमनेरकरांना मिळणार डॉ. विश्वंभर चौधरींना ऐकण्याची संधी…
निर्भय बनो प्रबोधन सभेसाठी निर्भय संगमनेरकर समूहाचे आयोजन
संगमनेर, ता. ११ ः संगमनेरात बुधवार ( ता. १३ ) रोजी दुपारी तीन वाजता, देशातील ज्येष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांच्या प्रबोधन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी संगमनेरातील निर्भय संगमनेरकर या विचारमंचाच्या समूहाने पुढाकार घेतला आहे.
गेल्या काही दिवसात देशातील राजकिय वातावरण प्रचंड मोठ्या प्रमाणात ढवळून निघाले आहे. गेल्या नऊ वर्षाच्या कार्यकाळात राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा, खोटी नाटी आश्वासने यामुळे तथातथीत धर्म व देशप्रेमाचा बुरखा गळून पडल्याचे दिसत आहे. विरोधकांवर इडी, सीबीआय या सारख्या शासकिय यंत्रणेच्या गैरवापरातून कठोर निर्बंध लादताना त्यांचे तोंड बंद केले जात आहे. या पार्श्वभुमिवर देशवासियांच्या डोळ्यावरचा तथाकथीत देशप्रेम, जाती धर्माचा पडदा फाडण्यासाठी अनेक साहित्यिक, विचारवंत सरसावले आहेत. वैचारिक जनजागृती करताना आम जनतेचे प्रबोधन करण्यासाठी, महाराष्ट्रात निर्भय बनो आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत राज्यात अनेक ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभांना मिळणारा प्रतिसाद थक्क करणारा आहे. जनतेला निर्भयपणे आपले म्हणणे मांडता यावे यासाठी वातावरण निर्मिती करणे हा या सभेचा उद्देश असून तो सफल होताना दिसत आहे.
बुधवारी ( ता. १३ ) शहरातील अकोले बायपास रस्त्यावरील स्वयंवर मंगल कार्यालयात या प्रबोधन सभेचे आयोजन करण्यात आले असून, देशातील ज्वलंत राजकिय व सामाजिक परिस्थीतीवर मार्गदर्शन व चर्चा करण्यासाठी शहर व परिसरासह तालुक्यातील नागरिकांनी या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन इंजि. मत्युंजय उर्फ अजय सोनवणे, अॅड. निशा शिवूरकर, डॉ अमित शिंदे, अॅड. ज्ञानेश्वर सहाणे, प्रा. मुश्ताक शेख, बाळासाहेब घोडके, चंद्रकांत पवार, अब्दुल्ला चौधरी, अजीजभाई ओहरा, अॅड. मीनल देशमुख, शांताराम गोसावी आदींनी केले आहे.