वाळू तस्करी करायची तर डान्सबारमध्ये घेऊन चल…
संगमनेर तालुक्यातील रंगेल तलाठ्याचे अजब फर्मान ;

वाळू तस्करी करायची तर डान्सबारमध्ये घेऊन चल…
संगमनेर तालुक्यातील रंगेल तलाठ्याचे अजब फर्मान ;
संगमनेर दि 12
तालुक्यातील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचे अनेक रंगेल किस्से आजपर्यंत अनेकांनी पाहिले तसेच ऐकिवात आहेत. असेच तालुक्यातील धांदरफळ येथील एका तलाठी महाशयाने तर आता थेट “वाळू तस्करी करायची असेल तर मुंबईला डान्सबारमध्ये घेऊन चल” असे फर्मान त्या तलाठ्याने काढल्याची तक्रार एका युवकाने तालुका पोलीस निरीक्षकांना देण्यात आली आहे.
संगमनेर तालुक्यातील काही तलाठ्यांचे अनेक रंगेल किस्से या अगोदरही समोर आले आहेत. कोणी रात्रीची गस्त घालताना सिन्नरच्या छम-छम मध्ये जाऊन पैसे उडवतात, कोणी शिर्डीच्या हॉटेलात आपली रात्र रंगीन करतात. तर काही संगमनेर तालुक्यातीलच लॉजमध्ये जाऊन कामाच्यावेळातच भलतेच उद्योग करताना काही महाविद्यालयीन तरुणांनी पाहिल्याने या घटनांची खमंग चर्चा सुरू असतानाच सागर कोकणे (रा धांदरफळ) याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री मुळे तलाठी यांनी “मित्राला फुकट वाळू टाक व मला वीस हजार रुपये रात्रभर वाळू वाहतूक करण्यासाठी दे, न दिल्यास तुझा ट्रॅक्टर धरून घेऊन जाईल व तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करीन”. अशी धमकी दिली. यावरही ते तलाठी महाशय थांबले नाही, त्यांनी थेट “मला मुंबईला डान्सबार मध्ये घेऊन चल व माझा जेवढा खर्च होईल तेवढा कर, न केल्यास तुझ्यावर वाळूचा, नाहीतर 353 दाखल करेल” अशी धमकी दिली.
तसेच संबंधित तलाठ्यांचा पैसे घेतानाचा व्हिडिओ सुद्धा त्या युवकाकडे असून त्या तलाठ्यावर कारवाई व्हावी.अशी तक्रार संगमनेर तालुका पोलीस निरीक्षकांना दिली आहे. त्यामुळे आता संबंधित तलाठ्यावर महसूल विभाग काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
विशेष म्हणजे याच तलाठ्याची काही व्हिडीओ याअगोदरही व्हायरल झाल्या होत्या. तलाठी कार्यालयासाठी चोरून विजेचा वापर केला गेल्याच्या तक्रारी प्रांत अधिकाऱ्यांना आल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाईही करण्यात आली होती. मात्र ठोस अशी कारवाई या तलाठ्यावर झाली नाही. या तलाठ्यावर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची नेहमीच मर्जी राहिलेली आहे. तर तालुक्यातील काही राजकीय कार्यकर्त्यांनीही त्या तलाठ्याला डोक्यावर बसवल्याने आता महसूल विभाग त्याच्यावर काय कारवाई करणार याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.