आपला जिल्हाब्रेकिंग न्युज

गारोळेपठारच्या आदिवासी महिला संतप्त !

अंगणवाडीस ठोकले टाळे 

संगमनेर ( प्रतिनिधी ) ः
तालुक्याच्या पठार भागातील कुरकुंडीच्या गारोळेपठार येथील अंगणवाडी केंद्राला स्थानिक महिलांनी टाळे ठोकले आहे. या अंगणवाडीतील मदतनिसाच्या रिक्त पदावर स्थानिक महिले ऐवजी गावठाण हद्दीतील दुसऱ्या महिलेची नियुक्ती केल्याने, स्थानिक महिलांनी अंगणवाडीला टाळे ठोकून आपला संताप व्यक्त केला आहे. 
एकात्मिक बाल विकास सेवा योजना घारगांव  प्रकल्पाअंतर्गत गारोळेपठार अंगणवाडीत रिक्त असलेल्या मदतनीस पदाची नुकतीच भरती करण्यात आली आहे. मात्र ती महिला स्थानिक नसल्याने, ही भरती प्रक्रीया मान्य नसल्याचे सांगत, संतप्त स्थानिक महिलांनी अंगणवाडी केंद्रास टाळे ठोकले. या जागेवर स्थानिक महिलेची नियुक्ती होईपर्यंत अंगणवाडीचे टाळे उघडणार नसल्याचे तसेच प्रसंगी आमच्यावर कारवाई झाली तरी चालेल असा ठाम निर्धार स्थानिक महिलांनी व्यक्त केला आहे. आदिवासी लोकवस्ती असलेल्या गारोळेपठार येथील  मुलांना बालपणापासून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी  २०१७ साली मिनी अंगणवाडीची सुरुवात झाली. तेंव्हापासून एका अंगणवाडी सेविकेची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता या मिनी अंगणवाडीचे रुपांतर अंगणवाडी केंद्रात झाल्यामुळे आता  या ठिकाणी मदतनीस पद भरण्यात आले आहे. मात्र याच पदावरुन गावातील वातावरण तापले आहे. या पदाच्या भरतीची माहिती स्थानिक महिलांना दिली नसल्याचा आरोप करीत, थेट मदतनिस म्हणून शोभा वायळ ही बाहेरची महिला कामावर हजर झाल्याने, या विरोधात स्थानिक महिलांनी संबंधित विभागाशी पत्रव्यवहारही केला आहे.  या पदावर काम करण्यासाठी स्थानिक महिलेला प्राधान्य देण्याची आवश्यकता होती. यात प्रशासनाने तातडीने गांभीर्याने लक्ष घालून तोडगा काढावा व मुलांचे शैक्षणीक नुकसान टाळावे अशी मागणी जयश्री मेंगाळ, सोनाली मेंगाळ, शांताबाई जाधव, सुमन केदार, लिलाबाई जाधव, कोंडाबाई केदार, चिमाबाई वारे, जयश्री जाधव, हिराबाई मेंगाळ, मिराबाई वारे, साक्षी जाधव आदींनी केली आहे.
———————-
चौकट –
अंगणवाडी बंद असल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असून, कुपोषणाचे प्रमाणही असल्याने मुले आहारापासून वंचित राहू नयेत यासाठी स्थानिक महिलांनी अडवणूक न करता, टाळे खोलून अंगणवाडी सुरु करु द्यावी.  
सरस्वती मेंगाळ ( अंगणवाडी सेविका, गारोळेपठार )
adminuniquemarathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!