गुंजाळवाडी येथील स्वस्त धान्य दुकान फोडल्याचा ग्रामस्थांचा आरोप! तहसीलदारांना दिले निवेदन..
धान्याचे पोते गायब!....
गुंजाळवाडी येथील स्वस्त धान्य दुकान फोडल्याचा ग्रामस्थांचा आरोप!; तहसीलदारांना दिले निवेदन..
धान्याचे पोते गायब!.
संगमनेर/प्रतिनिधी-
स्वस्त धान्य दुकानाचे कुलूप फोडून आमच्या हक्काचे धान्य चोरून नेल्याचा आरोप करत दुकानदार गुंजाळ व पुरवठा निरीक्षक यांनी संगनमताने हे दुकान फोडल्याचा आरोप करत यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची तोंडी मागणी संतप्त गुंजाळवाडी ग्रामस्थांनी तहसीलदार यांना एक निवेदन देऊन केली आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणीही नागरिक उपाशी राहू नये म्हणून रेशनधारकांना मोफत रेशन देण्याची योजना केली आहे. मात्र गावपातळीवर स्वस्त धान्य दुकानदारच मधल्या मध्ये गरिबांच्या तोंडातील घास ओरबडीत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
गुंजाळवाडी गावात स्वस्त धान्याचे दुकान चालवत असलेले विलास आबाजी गुंजाळ यांनी आपला स्वस्त धान्य दुकान परवाना कायम स्वरूपी बंद करण्याची मागणी जिल्हा पुरवठा अधिकारी अहमदनगर यांच्याकडे 20 सप्टेंबर 2022 रोजी लेखी अर्जाद्वारे केली होती. त्यानंतर सदर स्वस्त धान्याचे दुकान सायखिंडी विविध कार्यकारी सोसायटी यांना चालविण्यास दिले होते.
परंतु विलास गुंजाळ यांनी आपण दिलेला स्वस्त धान्य दुकानाचा राजीनामा 8 ऑगस्ट 2023 रोजी पुन्हा जिल्हाधिकारी पुरवठा विभागाकडे लेखी अर्ज करून परत मागे घेतला.
परंतु दरम्यान च्या काळात सायखिंडी विविध विकास कार्यकारी सोसायटीद्वारे नागरे हे अत्यंत चांगली सेवा आम्हा ग्रामस्थांना देत होते. त्यांच्या काळात आम्हाला तासंतास रांगेत उभे राहायला लागत नव्हते. त्यांची एकूणच धान्याचे वितरण पारदर्शक होते. याउलट विलास आबाजी गुंजाळ यांच्याद्वारे चालवत असलेले संभाजी गुंजाळ याच्यामुळे आम्हा ग्रामस्थांना तासनतास रांगेत उभे रहावे लागायचे. त्यांची धान्य वितरणाची सेवा एकूणच संशयास्पद होती. तसेच मध्यंतरीच्या काळात विलास गुंजाळ यांच्याद्वारे दुकान चालविणारे संभाजी गुंजाळ यांनी धान्याचा मोठा घोटाळा केला होता. त्याचा दंड ही प्रशासनाने त्यांना ठोठावला होता. अश्या घोटाळेबाज धान्य दुकानवाला आम्हाला नको आम्ही त्याच्या कडून रेशन धान्य घेणार नाही असा पवित्राच गुंजाळ वाडी ग्रामस्थांनी घेतला आहे.
दरम्यान 27 फेब्रुवारी 2024 रोजी सदर दुकान पूर्ववत करणेबाबत आदेश दिला त्या अनुषंगाने सायखिंडी सेवा सोसायटीने मार्च 2024 या महिन्यातील राहिलेले अन्य धान्य वितरण पुढील दोन दिवसांत संपवावे अन्यथा 26 मार्च रोजी सकाळी 10 वाजता आपल्या समक्ष स्वस्त धान्य दुकानाचा ताबा गुंजाळ यांना देण्यात येईल व आपण हजर न राहिल्यास आपणा विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईन असे पत्र तहसीलदार यांनी सायखिंडी सोसायटीला 22 मार्च 2024 रोजी दिले होते.
त्या अनुषंगाने ही ताबा दिल्याची कारवाई प्रशासनाने केली आहे. मात्र सदरचे पत्र मिळालेच नसल्याचा दावा सायखिंडी सोसायटीने केला आहे.
दरम्यान गुंजाळवाडी ग्रामस्थांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, मौजे गुंजाळवाडी स्वस्त धान्य दुकान हे मागील ७ ते ८ महिन्यापासुन सायखिंडी विविध कार्यकारी सोसायटी हे चालवत आहे. तरी ग्रामसभेमध्ये १४डिसेंबर २०२३ चा ठराव होवुन सदर रेशन दुकान हे सायखिंडी विकास सोसायटी यांना चालविण्यास देण्यात आले. तेव्हा पासुन आज पावेतो तेच चालवत आहे. परंतु आज सकाळी दिनांक २८/०३/२०२४ रोजी १० वाजता रेशनधारक आले असता सदर गोडावुनला कुलूप लावलेले आढळून आले. तसेच सदरच्या गोडावुन मध्ये कोणत्याही प्रकारचे धान्याचे पोते आढळुन आले नाही.
तरी सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच ग्रामसेवक व ग्रामस्थ यांना रेशन चालक सायखिंडी विकास कार्य सोसायटी यांनी फोन करुण कळविले की सदरचे स्वस्त धान्य दुकान बंद आहे. तसेच रेशनधारकांना धान्य वाटप करण्यासाठी धान्य उपलब्ध नाही.
तसेच आमच्या सर्वांची म्हणजेच मौजे गुंजाळवाडी सर्व रेशनधारक यांची आपणास विनंती आहे की सदरचे स्वस्त धान्य दुकान हे सायखिंडी विविध कार्यकारी सोसायटी यांच्याकडे चालविण्यास रहावे, इतर कोणासही चालविण्यात देवु नये. इतर कोणाला चालविण्यास दिल्यास आम्ही ग्रामस्थ तहसिल कार्यालय येथे आंदोलन करु. तसेच इतर कोणाला चालविण्यास दिल्यास आम्ही रेशनधारक रेशन घेणार नाही. तरी सायखिंडी विविध कार्यकारी सोसायटी यांच्याकडे चालविण्यास रहावे हि नम्र विनंती.
आम्ही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी केली आहे. सायखिंडी सोयायटीला वारंवार सांगूनही त्यांनी गुंजाळ दुकानदारास ताबा न दिल्याने प्रशासनाने व्हिडीओ शूटिंग काढून एकतर्फी ताबा घेतला आहे. संबंधित गुंजाळ दुकानदाराबद्दल ग्रामस्थांच्या ज्या काही तक्रारी असतील त्या त्यांनी रीतसर लेखी तक्रारीत कराव्यात त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करू. – तहसीलदार धीरज मांजरे