ब्रेकिंग न्युज

शिर्डी लोकसभा मतदार संघात रंगणार राजकिय धुळवड….

उत्कर्षा रुपवते यांच्या रुपाने वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात

शिर्डी लोकसभा मतदार संघात रंगणार राजकिय धुळवड….

उत्कर्षा रुपवते यांच्या रुपाने वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात

——————————
संगमनेर ( प्रतिनिधी ) ः

शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून भाऊसाहेब वाकचौरे आणि महायुतीकडून सदाशिव लोखंडे या आजी माजी खासदारांमध्ये थेट लढत होणार आहे. शिर्डीची उमेदवारी काँग्रेसला मिळवण्यात पक्षश्रेष्ठींना अपयश मिळाले आणि त्यामुळे नाराज झालेल्या इच्छुक उमेदवार उत्कर्ष रूपवते यांनी काँग्रेसची साथ सोडल्याचे त्यांच्या कृतीतून दिसून आले आहे.  प्रसारमाध्यमांमध्ये त्यांनी बंडखोरी केल्याच्या वावड्या उठल्या असतानाच, आज त्यांनी मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची सदिच्छा भेट घेतल्याची छायाचित्रे प्रसारमाध्यमावर झळकली आहेत. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या राजकारणात ऐन रंगपंचमीच्या दिवशी राजकीय धुळवड उडणार असल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले असल्याने, दोन्ही प्रस्थापित उमेदवारांसाठी उत्कर्षा रूपवते या डोकेदुखी ठरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राज्याच्या महिला आयोगाच्या सदस्या आणि काँग्रेसच्या युवा नेत्या उत्कर्षा रूपवते यांनी या वेळच्या लोकसभेसाठी अनेक दिवसांपासून कंबर कसली होती.  शिर्डी लोकसभा  मतदार संघ पिंजून काढतांना, कार्यकर्त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार असल्याची आशा दाखवली होती. त्यांच्या दिवंगत वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी यामुळे मिळणार होती. मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मतदारसंघाची ही जागा खेचून आणण्यात अपयशी ठरले आणि ही जागा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला गेल्याने सदर उमेदवारी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना मिळाली. त्यामुळे नाराज झालेल्या उत्कर्षा रूपवते यांनी समाज माध्यमातील वॉलवरून काँग्रेसच्या नेत्यांचे फोटो आणि चिन्ह काढून टाकल्याने, त्यांना काँग्रेसच्या हातातील हात काढून घेतल्याने त्या पुन्हा चर्चेत आल्या. आणि आज त्यांनी थेट वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याने आता शिर्डी मतदारसंघात उत्कर्षा रुपवते या वंचित आघाडीकडून निवडणूकीत रिंगणात उतरणार असल्याचे  स्पष्ट होऊ लागले. त्यांनी वंचित आघाडीकडून उमेदवारी केल्यास, त्यांच्या रूपाने शिर्डी लोकसभेला नवा चेहरा मिळणार आणि त्या निवडून येणार असल्याच्या प्रतिक्रिया सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. तर त्यांच्या उमेदवारीमुळे  तर उबाठा गटाचे भाऊसाहेब वाकचौरे आणि शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांना यंदाची निवडणूक जड जाणार असल्याचेही बोलले जात आहे.

उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर पडलेल्या गद्दारीचा शिक्का काही केल्या पुसला गेलेला नाही. जनतेमध्ये त्यांच्याबाबत प्रचंड नाराजी असूनही, त्यांच्याच गटात अनेक हेवेदावे असल्याने त्याचा परिणाम मतदानावर होणार असल्याची चर्चा आहे. अवघ्या १७ दिवसात केवळ नशीब आणि मोदी लाटेवर स्वार होऊन विजयी झालेले  शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी पुन्हा निवडून येण्याचे स्वप्न पाहिले असले तरी, त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे मतदारसंघात त्यांच्यावरही प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे. त्यांच्या कार्यकाळात ते  मतदारसंघात फिरकले नसल्याने मतदारांमध्येही नाराजी असल्याचे दिसून येते.  एकंदरीतच उत्कर्षा रूपवते यांच्या राजकिय कारकिर्दीला या वेळी नक्कीच बळ मिळेल अशी सकारात्मक परिस्थीती निर्माण झाली आहे. त्यांचा हा निर्णय योग्य असल्याची प्रतिक्रीया समाजमाध्यमांवर उमटू लागली आहे.  त्यांना माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार सुधीर तांबे यांनी मदत केल्यास, रुपवते यांना ही निवडणूक मुळीच अवघड जाणार नाही.  विशेष म्हणजे ज्याप्रमाणे आमदार सत्यजित तांबे यांना भाजपने मदत केली आणि ऐन वेळेस उमेदवार रद्द केला त्याप्रमाणे शिर्डी मतदार संघात थोरात आणि तांबे यांनी ठरवले तर ते रुपवते यांना वंचितमधून निवडून आणू शकतात अशी चर्चा दबक्या आवाजात मतदारसंघात होत आहे. तर आता उत्कर्षा रूपवते राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा निर्णय घेणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असून, त्या वाकचौरे आणि लोखंडे यांच्यासाठी डोईजड होणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे.

adminuniquemarathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!