वाकचौरेंच्या मार्गात शिर्डीच्या तुपाची निसरडी वाट….
आजी माजी खासदारांच्या आरोप प्रत्यारोपामुळे गाजणार शिर्डी लोकसभेची निवडणूक
वाकचौरेंच्या मार्गात शिर्डीच्या तुपाची निसरडी वाट….
आजी माजी खासदारांच्या आरोप प्रत्यारोपामुळे गाजणार शिर्डी लोकसभेची निवडणूक
संगमनेर(प्रतिनिधी)-
लोकसभेच्या बहुचर्चित २०२४ च्या निवडणुकीची रणधुमाळी सूरु झाली असून, महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या नावांच्या याद्या समोर येऊ लागल्या आहेत. जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या शिर्डी मतदार संघातून, पूर्वाश्रमीच्या शिवसेनेच्या दोन्ही आजी माजी खासदारांना उमेदवारी मिळाल्याने ते एकमेकांसमोर दंड ठोकून उभे ठाकले आहेत. अश्यातच महाविकास आघाडीचे तिकीट माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना गेल्याने, दिवंगत प्रेमानंद रुपवते उर्फ बाबुजी यांच्या नाराज झालेल्या कन्या, काँग्रेसच्या राज्य सरचिटणीस उत्कर्षा रुपवते यांनी वंचितचे नेते प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतल्याने, त्या वंचितकडून आपले नशीब आजमावताहेत की काय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसे झाल्यास शिर्डी मतदार संघातील तिरंगी लढत चुरशिची होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महाविकास आघाडीत शिर्डीची जागा शिवसेनेलाच राहिल्याने अनेक राजकीय खलबतांनंतर शिवसेनेच्या तिकिटावर माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेंची उमेदवारी घोषित झाली आहे. त्यांच्या विरोधात पूर्वाश्रमीच्या शिवसेनेचे व सध्या शिंदे गटात सामील झालेले विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना शिंदे गटाकडून शिवसेनेच्या तिकिटावर तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे. महाविकास आघाडीत शिवसेनेकडून २०१४ च्या सुमारे १० वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर नंतर पुन्हा आपले नशीब आजमावू पाहणारे भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपल्या खासदारकीच्या तत्कालिन निधीचा वापर गावोगाव केवळ सभामंडप बांधण्यापुरताच वापरल्याची टीका त्यांच्यावर होत आहे. त्यावर वरकडी म्हणजे प्रतिस्पर्धी उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी संस्थानच्या प्रसाद लाडूंसाठी वापरण्यात येणाऱ्या तुपाच्या खरेदीत १० लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची टीका प्रसार माध्यमांशी बोलताना करीत, गोळीबाराला सुरुवात केली आहे. तसेच आपल्या कार्यकाळात वाकचौरे निष्क्रिय खासदार असल्याची त्यांची ओळख निर्माण झाल्याची टीका होत आहे. तसेच शिवसेनेकडून २००९ साली खासदारकीचे तिकीट मिळवून पाच वर्ष वर्षे खासदारकी भोगलेले वाकचौरे नंतर २०१९ सालच्या निवडणूकीतील दारुण पराभवानंतर थेट भाजपवासी झाले. आणि पुन्हा खासदारकीच्या महत्वाकांक्षेने थेट मातोश्री गाठत उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन हाती बांधले. तसेच ठाकरे सेनेचे तिकीट पदरी पाडून घेण्यात यशस्वी देखील झाले.
या वेळच्या निवडणूकीचे सूत्र काहीसे बदलले आहे. देशात सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपाने प्रादेशिक व इतर पक्षांची फोडतोड करुन, तिसऱ्यांदा विजयासाठी अबके बार चारसौ पारचा नारा लगावला आहे. त्यासाठी साम, दाम, दंड भेद या सर्व नीतींचा वापरही सुरु केला आहे. महाराष्ट्रात भाजपाने शिवसेनेला मोठे खिंडार पाडून त्याचे विभाजन करीत, शिंदे गटाला आपल्या सोबत घेतले तसेच शरद पवारांची राष्ट्रवादी फोडून महायुती करत अजित पवारांना देखील उपमुख्यमंत्री पदावर बसवले. महायुतीकडून शिंदे गटाने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडेना रिंगणात पुन्हा संधी दिल्याने, त्यांच्या विरोधात दंड थोपटलेल्या वाकचौरे यांच्यासमोर दहा वर्षाच्या गॅपचे संकट उभे आहे. या कालावधीत तुटलेला अथवा कमी झालेला जनसंपर्क थोड्या अवधीत पुन्हा भरुन काढण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. तसेच या वेळी ते कोणते मुद्दे घेऊन जनतेसमोर जात प्रचारात आघाडी घेणार ते पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे. आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात वाकचौरे यांनी विखे पाटलांच्या मतदार संघात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला नाही. तोच कित्ता त्यांच्यानंतर खासदारकीची धुरा वाहणाऱ्या सदाशिव लोखंडे यांनीही गिरवला. त्यामुळेच लोणी ( ता. राहाता ) येथील कार्यक्रमात सार्वजनिक व्यासपीठावर वाकचौरे यांनी विखे पाटील यांच्या कृतज्ञतेचा उल्लेख करीत त्यांचे आभार मानले होते. या काळात बहुतांश जनतेला ते कसे आहेत हे माहितही नव्हते ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचू न शकलेले वाकचौरे या वेळी कोणता करिष्मा करतात हे देखील येणारा काळच सांगेल. शिर्डी मतदारसंघात संगमनेर, अकोले, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, नेवासे व राहुरी तालुक्यातील काही गावे समाविष्ट आहेत. संगमनेर तालुक्यातून महाविकास आघाडीत काँग्रेसचे जेष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे यांची तर भरभक्कम साथ वाकचौरेंना लागणारच आहे. त्याचबरोबर महसूलमंत्री व भाजपचे स्टार प्रचारक म्हणून पक्षाची मोठी जबाबदारी खांद्यावर घेतलेले राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी मतदार संघातून सदाशिव लोखंडेंना निवडून आणण्यासाठी काहीही करणार हे उघड असल्याने या कुरुक्षेत्रावर सत्ताधारी पक्षाच्या विरोधात दंड थोपटलेल्या वाकचौरे यांच्यासमोरील संकटाचे ढग पाहता ही लढाई वाटते तितकी सोपी जाणार नाही हे मात्र खरं आहे.
दुखावलेल्या शिवसैनिकांची कशी काढणार समजूत..?
आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात भाऊसाहेब वाकचौरे अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पडताणी काँप्लेक्सच्या व्यापारी असोसिएशनच्या हॉलमधील कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. या वेळी काही दिवसांपूर्वी त्यांचे पुतळे जाळून आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांकडे पाहून, त्यांनी ” माझे पुतळे जाळता काय…तुमच्याकडे पाहतो ” असा दम देत खुन्नस काढली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी पोलीस आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांसमोर त्यांना धक्काबुक्की करीत, त्यांचे कपडे फाडले होते. धास्तावलेल्या वाकचौरेनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात आश्रय घेतला होता. या प्रकरणी पोलिसांनी शिवसेनेचे शहर प्रमुख अमर कतारी यांच्यासह दोन जणांवर गुन्हा दाखल केला होता. अद्यापही या घटनेच्या आठवणी शिवसैनिकांमध्ये कायम असल्याने या दुखावलेल्या शिवसैनिकांची नाराजी कशी काढणार हे आव्हानही वाकचौरे यांच्यासमोर आहे.