ब्रेकिंग न्युज

खासदार सदाशिव लोखंडे पुन्हा शिर्डी लोकसभेच्या रिंगणात

तिसऱ्यांदा नशीब आजमवणार परंतु जनता काय करणार?

साईबाबा कोणाला पावणार… ?

खासदार सदाशिव लोखंडे पुन्हा शिर्डी लोकसभेच्या रिंगणात

तिसऱ्यांदा नशीब आजमवणार परंतु जनता काय करणार?

———————

संगमनेर ( प्रतिनिधी ) ः

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभेची जागा ही अतिशय सन्मानजनक मानली जाते. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे विखे पाटील यांच्या छत्रछायेखाली असलेला उमेदवार या ठिकाणी निवडून येतो याचा प्रत्यय खासदार भाऊसाहेब वाकचौरे व सदाशिव लोखंडे यांच्या उमेदवारीच्या रुपाने, तर रिपब्लिकन पक्षाचे बलाढ्य नेते खासदार रामदास आठवले यांच्या दारुण पराभवाने आला आहे. लोकसभेच्या दोन टर्म नंतर पुन्हा एकदा सदाशिव लोखंडे तिसऱ्यांदा शिर्डी लोकसभेचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. दरम्यानच्या काळात झालेले राजकिय बदल, त्यांच्याविषयी जनतेची बदललेली मानसिकता या पार्श्वभूमीवर लोखंडे यांचे भवितव्य पणाला लागल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

खासदार लोखंडे यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातीलच दिघोळचा. मात्र लहानपण चेंबूरच्या वत्सलाताई नाईकनगर झोपडपट्टीत गेले. उच्च माध्यमिकपर्यंतचे शिक्षण कुर्ल्यातील एका शाळेत झाले. त्यांची आई कुर्ला ते भायखळा दरम्यान भाजीपाला विकायच्या तर वडील गटई काम करायचे. त्यांच आठ भावंडांचं मोठ कुटूंब होतं. हिंदूत्वाचे आकर्षण असलेले तारुण्यावस्थेतील लोखंडे संघाच्या शाखेत जाऊ लागले. १९७० च्या दशकात ते भाजयुमोचे सचिव म्हणून स्व. प्रमोद महाजन यांचे निष्ठावंत कार्यकर्ते झाले. चेंबूर व कुर्ला परिसरात लहानपण व राजकारणाची बाराखडी गिरवलेले सदाशिव लोखंडे यांनी अहमदनगर जिल्ह्यातून निवडणूक लढवली, भाजपकडून सलग तीन वेळा आमदार व शिवसेनेकडून सलग दोन वेळा खासदारही झाले. काँग्रेसचा गड समजला जाणाऱ्या कर्जत जामखेड मतदार संघात संघाने माधव पॅटर्न राबवला होता. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना व भाजपच्या युतीत ही जागा भाजपच्या वाट्याला आली आणि लोखंडेंना विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळाले. त्यानंतर सलग तीन वेळा ते याच मतदार संघात आमदार म्हणून निवडून गेले.

वाकचौरेंची चूक व लोखंडेंचा योगायोग

२००९ मध्ये लोकसभेच्या शिर्डी मतदार संघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रिब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांना उमेदवारी जाहीर केली. दक्षिण लोकसभा मतदार संघाची जागाही काँग्रेसला न देता पवारांनी राष्ट्रवादीकडेच राखली. त्यामुळे माजी मंत्री बाळासाहेब विखे पाटील नाराज झाले. शिवसेनेकडून भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी मिळाली. विखेंनी मतदानाच्या आधी दोन दिवस असे चक्र फिरविले की, आठवलेंच्या स्मृती पटलावरून शिर्डीचा पराभव कधीच पुसला गेला नाही. २०१४ च्या निवडणुकीत भाऊसाहेब वाकचौरे यांना शिवसेनेचे तिकीट मिळणार हे निश्चित समजले जात होते. मात्र मतदानाला अवघे २० दिवस बाकी असताना त्यांनी अचानक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर शिवसेनेला या राखीव जागेसाठी अनुसूचित जातीचा उमेदवार हवा होता. सदाशिव लोखंडे यांनी मतदानाच्या १७ दिवस आधी शिवसेनेत प्रवेश करत उमेदवारी अर्ज भरला. प्रचारही नीट न झालेले, कोणाला माहितही नसलेले सदाशिव लोखंडे देशात आलेल्या नरेंद्र मोदींच्या लाटेवर स्वार होऊन योगायोगाने शिर्डी मतदार संघाचे खासदार झाले. राज्यात भाजप महायुतीचे सरकार आहे.

सध्या भाजप-शिवसेना एकनाथ शिंदे-राष्ट्रवादी अजित पवार गट हे एकत्र आहेत. भाजपच्या किसान मोर्चाने खासदार लोखंडे यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुश काळे यांनी थेट शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले होते. या अंतर्गत धुसफूशीनंतरही शिवसेनेने ( शिंदे गट ) हा पारंपरिक मतदार संघ राखला असून, हॅटट्रिक करण्याच्या उद्देशाने लोखंडे पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत.

मतदारसंघातील प्रचंड नाराजीचा करावा लागणार सामना

खासदार लोखंडे नेहमीच आपोर प्रत्यारोपांच्या गर्तेत सापडले आहेत. ते शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांसह कोणाच्याच संपर्कात नसल्याचा आरोप करीत भाजपाच्या किसान मोर्चाने त्यांची कोंडी केली आहे. त्यांची उठबस फक्त ठेकेदारांशी असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून तसेच बाळासाहेब ठाकरे यांना मानणाऱ्या निष्ठावान शिवसैनिकांनी त्यांना दोन वेळेस संसदेत पाठवले. मात्र, गेल्या १० वर्षांत मतदारसंघात म्हणावा असा विकास झालेला नाही. मतदारसंघात अतिवृष्टी झाली, दुष्काळ पडला. अशा काळात मतदारसंघात राहून कार्यकर्त्यांमार्फत लोकांपर्यंत जायचे असते, परंतु खासदार लोखंडे हे संपर्कात नसल्याने मतदारसंघामध्ये प्रचंड नाराजी आहे.

आयुष्य मुंबईच्या रंगीबेरंगी दुनियेत गेलेल्या लोखंडेंना या मातीतल्या शेतकऱ्यांच्या मुलभूत प्रश्नांची जाण नसल्याचा आरोपही त्यांच्यावर होत आहे. या वेळच्या निवडणूकीत माजी खासदार वाकचौरे व लोखंडे या आजी माजी खासदारांमध्ये थेट लढत होत असल्याने, त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्रशायकिय कामांचा दांडगा अनुभव आणि अकोले या मुळच्या शिर्डी लोकसभा मतदार संघातील रहिवाशी असलेल्या भाऊसाहेब वाकचौरे यांना शिवसेना उबाठा पक्षाकडून २०२४ साठी अधिकृत उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर लोखंडे यांनी दोन दिवसांपूर्वी वाकचौरे यांनी साईबाबांच्या प्रसादाच्या तुपात १० लाख रुपयांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उकरुन त्यांना आव्हान दिले. सदाशिव लोखंडे यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या दहा वर्षाच्या कामाचा पाढा वाचून दाखवला होता. त्यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणाचीच कामे केली नाही अशी टिप्पणी करत भाऊसाहेब वाकचौरेंना लक्ष केले होते. साईसंस्थान मध्ये विश्वस्त असताना तुपाचे दहा लाख रुपये खाल्ल्याचा तसेच फक्त सभा मंडप बांधले म्हणजे विकास होत नाही. आपण पैलवान असून आज ही दररोज सात किलोमिटर पायी चालतो असे सांगून वाकचौरेंना कुस्तीचे आव्हान दिले होते. यावर माध्यमांशी बोलताना वाकचौरे यांनीही लोखंडे यांचा समाचार घेतला. वाकचौरे म्हणाले की, गेल्या दहा वर्षापासून खासदार गायब आहे. फक्त निवडणूकीपुरतं मतदार संघात यायचं, खोटे आरोप करायचे आणि नंतर गायब व्हायचं हा त्यांचा फंडा आहे. ते स्वतः मद्यपी असून लोकांना मद्य पाजणे हा त्यांचा धंदा आहे. माझ्यावर केलेले तुपाचे आरोप खोटे असून त्याची रीतसर चौकशी झाली आहे. दररोज सात किलोमिटर मुंबई किंवा समुद्रात चालण्यापेक्षा शिर्डी लोकसभा मतदार संघात चालले असते तर जनतेची कामे झाली असती. मात्र त्यांनी फक्त टेंडर आणि टक्केवारी घेण्यात धन्यता मानली आहे. पुण्यातील सॅनिटरी नॅपकिन टेंडर घोटाळ्यात त्यांचे नाव आले होते. विद्यार्थिनींच्या मोफत सॅनिटरी नॅपकिन मध्ये सुद्धा ठेकेदार आणि टक्केवारी घेणारे माझ्यावर कसे आरोप करतात असा सवाल वाकचौरे यांनी उपस्थित केला आहे.

काय आहे सॅनिटरी नॅपकिन प्रकरण

पुणे शहरातील महापालिका शाळांमध्ये सातवी ते दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या ३८ हजार विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकिनचे वाटप केले जाते. महापालिकेकडून दरवर्षी शाळा सुरू झाल्यानंतर जुलै महिन्यात मुलींना हे नॅपकीन पुरवले जातात. मात्र यातील निविदा प्रकरणात रींग झाल्याचा आरोप झाला होता. यावेळी सत्ताधारी पक्षातील एक आमदार आणि एक खासदार ‘एजंटगिरी’ करीत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. तसेच नवीन निविदा प्रक्रियेत, शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी पुणे लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी असताना, त्यांच्या पसंतीच्या कंत्राटदाराला निविदा देण्यास भाग पाडल्याचा आरोप पुणे शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगीता तिवारी यांनी पत्रकार परिषदेत केला होता. साईसंस्थान मधील तुपाचे आणि पुण्यातील सॅनिटरी नॅपकिनचे प्रकरण जरी काहीसे जुने असले तरी, लोकसभा निवडणूकीच्या माध्यमातून ते चांगले गाजणार हे यानिमित्ताने समोर येत आहे. यामुळे शिर्डी लोकसभेचे राजकिय वातावरण तापले आहे.

adminuniquemarathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!