उ बा ठा गटाच्या भाऊसाहेब वाकचौरे यांच्या बैठकीत राडा ?
गटबाजी उघड ; दोन गटात शिवीगाळ, गेले अंगावर धावून
उ बा ठा गटाच्या भाऊसाहेब वाकचौरे यांच्या बैठकीत राडा ?
गटबाजी उघड ; दोन गटात शिवीगाळ, गेले अंगावर धावून
संगमनेर दि 4 प्रतिनिधी
मंगळवारी (दि 3) माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी फाट्यावर एका हॉटेलात कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत लोकसभा समन्वयक व संपर्कप्रमुखांसमोर तालुक्यातील शिवसेनेतील (उ बा ठा) गटात प्रचंड नाराजी असल्याचे दिसून आले. माजी खासदार वाकचौरे यांच्या समोरच दोन गटात तुफान शिवीगाळ आणि हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला असल्याने अंतर्गत कलह समोर येत आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत वाकचौरेंना त्यांच्याच कार्यकर्त्यांचा डोक्याला ताप होणार असल्याचे बोलले जात आहे.
लोकसभेचे बिगुल वाजले असून शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी संगमनेर तालुक्यातील कार्यकर्ते एकत्र करत आगामी निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी शहरा नजीक असलेल्या रायतेवाडी फाट्यावर एका हॉटेलमध्ये एकत्र जमण्याचे ठरवले. तसे ते दुपारी एकत्र आलेही, तालुक्यातुन विविध गावातून शिवसैनिक पदाधिकारी याठिकाणी आले होते. अगोदरच वाकचौरे यांच्या पक्ष बदल्याच्या भूमिकेमुळे नाराज असलेले शिवसैनिकांची पूर्णपणे नाराजी दूर करण्यात वाकचौरे यांना अपयश आले आहे.
त्यातच काल झालेल्या बैठकीत दोन गट एकमेकांसमोर उभे राहिले. लोकसभा समन्वयक व संपर्कप्रमुखांसमोर वाकचौरे यांच्या उपस्थितीत काही कार्यकर्त्यांनी आर्थिक जुने वाद उकरून काढून एकमेकांची उणिधुनी काढली. शिवीगाळ, अंगावर धावून शिवसेना स्टाईलने वादाला सुरुवात झाली. दरम्यान हा वाद विकोपाला जाऊ नये म्हणून वाकचौरे यांनी समजवण्याचा अनेकवेळा प्रयत्न करत खडे बोल सुनावले. यातून उद्धव ठाकरे सेनेत असलेली गटबाजी आणि नाराजी या बैठकीतून उफाळून बाहेर आल्याने आगामी काळात शिवसेना (उ बा ठा) भाऊसाहेब वाकचौरे यांना आपलेच कार्यकर्ते डोकेदुखी ठरणार की, नाराजी दूर करणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.