आपला जिल्हाब्रेकिंग न्युज
दुधाला प्रतिलिटर ४० रुपये दराच्या मागणीसाठी आक्रमक दुग्धोत्पादकांची ट्रॅक्टर रॅली धडकली संगमनेरात
दोन तिन दिवसात मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन उभारणार ः कॉ. अजित नवले
संगमनेर ( प्रतिनिधी ) ः
दुधाला प्रतिलिटर ४० रुपये भाव मिळावा या मुख्य मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन सुरू आहे. याचा एक भाग म्हणून आज अकोले व संगमनेर तालुक्यातील दुग्धोत्पादक शेतकऱ्यांनी शेकडोच्या संख्येत काढलेला ट्रॅक्टर मोर्चा आज संगमनेरात धडकला. प्रामाणिक कष्ट करुन शेतकऱ्यांच्या हाती शेणाशिवाय काहीच पडत नाही हे दर्शवण्यासाठी रॅलीत ट्रॅक्टर ट्रॉलीत भरुन आणलेले शेण शासकिय विश्रामगृहासमोरच्या रस्त्यावर टाकून राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी कृत्याचा निषेध करण्यात आला.
दुधाला प्रतिलिटर ४० रुपये भाव मिळावा यासाठी अकोले तालुक्यातील कोतुळ या ठिकाणीगेल्या १९ दिवसांपासून दुग्धोत्पादक शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन सुरु आहे. दूध हंडी, कोतुळ बंद, शेतकरी मेळावा अशा विविध मार्गाने आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा आंदोलक प्रयत्न करत आहेत. मात्र याची दखल न घेतल्याने संगमनेर प्रांताधिकारी कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर रॅली काढत आंदोलन करण्यात आले. मंगळवारी सकाळी अकोले तालुक्यातील कोतुळ ते संगमनेर प्रांत कार्यालय या ५५ किलोमीटर अंतरामध्ये शेकडो ट्रॅक्टर व ट्रॉली यांची भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत शेकडो शेतकरी ट्रॅक्टर व ट्रॉलीवर दूध उत्पादनाशी संबंधित विविध साधने सजवून ट्रॅक्टर रॅलीमध्ये सहभागी झाले होते. कोतुळ येथून निघणारी ही रॅली दूध उत्पादनाचा पट्टा असलेल्या धामणगाव पाट, धामणगाव आवारी, अकोले तहसील कार्यालय, कळस, चिखली मार्गे, संगमनेर शहरात दाखल झाली. या रॅलीमध्ये अकोले व संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादक मोठ्या संख्येने सामील झाले होते.
संगमनेरात आलेली ट्रॅक्टर रॅली कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव प्रशासनाने बसस्थानकासमोरील नवीन नगर रोडवरील प्रांताधिकारी कार्यालयाऐवजी नाशिक पुणे राज्यमार्गावरील शासकिय विश्रामगृहाकडे नेण्याचा पर्याय निवडला. रॅलीला सामोरे जात प्रांताधिकारी शेलेश हिंगे यांनी आंदोलकांच्या मागण्या ऐकून घेत निवेदन स्वीकारले. या निवेदनात दुधाला प्रति लिटर 40 रुपये भाव मिळावा व दूध प्रश्न कायमचा सुटावा यासाठी दुधाला एफ. आर. पी. व रिव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे, पशुखाद्याचे दर कमी करावेत, दूध भेसळ तातडीने थांबवावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
दूध धंदयातील सर्व उत्पन्न सरकारच्या धोरणामुळे खासगी व सहकारी दूध संघ व इतरांनी लुटून नेले आहे. शेतकऱ्याला या व्यवसायातून केवळ शेणच शिल्लक राहत आहे. अशा पार्श्वभूमीवर ते तरी कशाला ठेवता ते शेणही घेऊन जा, अशा प्रकारची संतप्त भावना व्यक्त करण्यासाठी ट्रॅक्टर रॅलीच्या आघाडावरील शेणाने भरलेल्या ट्ऱॉली शासकिय विश्रामगृहासमोरच्या रस्त्यावर ओतून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. येत्या दोन तीन दिवसांत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर हा मोर्चा महसूलमंत्री यांच्या गावात तसेच मुंबईपर्यंत नेत राज्यव्यापी आंदोलन उभारू असा इशारा डॉ. अजित नवले यांनी सरकारला दिला आहे. या आंदोलनात डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, विनोद देशमुख, अभिजित देशमुख, नामदेव साबळे, बाळासाहेब गीते, प्रकाश देशमुख, भाऊसाहेब देशमुख, अभिजित भाऊसाहेब देशमुख, गणेश जाधव, योगेश बाळासाहेब देशमुख, गौरव बनोटे, सुनील आरोटे, राजेंद्र देशमाने, दीपक पवार आदींसह मोठया संख्येने दुग्धोत्पादक शेतकरी सहभागी झाले होते.