आपला जिल्हाब्रेकिंग न्युज

बदलापूर येथील नृशंस घटनेच्या निषेधार्थ शनिवारी आठवडे बाजारसह संगमनेर शहर बंद

हजारो विद्यार्थिनींनी रस्त्यावर उतरून आरोपीला फाशी देण्याची केली जोरदार मागणी

 संगमनेर ( प्रतिनिधी ) ः ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील शाळेतील अल्पवयीन मुलीवर झालेल्या घृणास्पद लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ शनिवार दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी संगमनेर शहर व तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात येणार असून, शनिवारी शहरात भरणारा आठवडे बाजारही बंद ठेवण्याचे आवाहन संगमनेर तालुका महाविकास आघाडीच्यावतीने करण्यात आले असून या अमानुष घटनेचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला आहे. पुरोगामी व सुसंस्कृत महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या या घटनेचे संपूर्ण राज्यभर तीव्र पडसाद उमटले असून राज्यभरातून या घटनेचा निषेध होत आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत संगमनेर तालुका भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष, सर्व पुरोगामी संघटना, मित्रपक्ष आरपीआय व इतर समविचारी पक्षांनी या बंदला संपूर्णपणे पाठिंबा दर्शवला असून शनिवारी आठवडी बाजारसह संपूर्ण शहर व तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे.
खरे तर महिला शक्ती ही देशाची ताकद आहे .परंतु महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाहीत. अनेक मुली व महिलावर्गासह पालकांमध्येही आपल्या पाल्याच्या सुरक्षिततेविषयी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींना कायद्याचा धाक व जरब नसल्याने राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. अल्पवयीन शालेय मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बदलापूर घटनेतील नराधम आरोपीला कोणतेही राजकीय संरक्षण न देता तातडीने फाशी द्यावी अशी जोरदार मागणी सर्वत्र होत आहे. या पार्श्वभुमिवर आज संगमनेरात हजारो विद्यार्थिनींनी रस्त्यावर उतरून काढलेल्या मोर्चात आरोपीला फाशी देण्याची जोरदार मागणी केली.
या वेळी मोर्चाला संबोधीत करताना माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे म्हणाल्या, काही समाजकंटकांना महिलांना पुन्हा पारतंत्र्यात न्यायचे आहे. पूर्वी महिलांना सती जाण्यासाठी जाळले जायचे.आता हजारो महिलांचा गर्भपात करून निष्पाप कळ्या गर्भातच खुडल्या जात आहेत. महिलांना घटनेने दिलेल्या अधिकाराची खुलेआम पायमल्ली होत आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे  असल्या तरी, अजूनही त्यांना हीन दर्जाची वागणूक दिली जात आहे. देशभरात घडणाऱ्या अत्याचारांच्या पार्श्वभुमीवर शालेय व महाविद्यालयीन मुलींमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले असून, पालकही त्यांना शाळेत पाठवायला घाबरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अशा आरोपींना भर चौकात जिवंत जाळण्याची मागणी त्यांनी केली.
संगमनेर शहरात जयहिंद महिला मंच, एकविरा फाउंडेशन व विविध महिला संघटनांच्यावतीने झालेल्या भव्य निषेध मोर्चात दुर्गाताई तांबे, सुनीता कोडे, अर्चना बालोडे, डॉ. श्रद्धा वाणी, सुनीता कांदळकर, शितल उगलमुगले, सुरभी मोरे, मनीषा शिंदे, नम्रता पवार, अमृता राऊत आदींसह सुमारे तीन हजार मुली सहभागी झाल्या होत्या. सह्याद्री विद्यालयापासून निघालेला मोर्चा नवीन नगर रोड, लिंक रोड, पुणे नाशिक हायवे ते बस स्थानक या मार्गावरुन जोरदार घोषणाबाजी देत काढण्यात आला.
चौकट ः मोर्चाला संबोधित करताना दुर्गाताई झाल्या भावूक
आम्हा महिलांच्या बालपणाचा काळ अत्यंत निर्धाक वातावरणात व सुखा समाधानात गेला. मात्र बदललेल्या कालखंडात गेल्या काही वर्षांमधील घटना पाहता, या पिढीतील मुलींचे भविष्य सुरक्षिततेअभावी गढूळ झालेले दिसते आहे. त्यांच्या भविष्यात काय वाढून ठेवले आहे याची कोणालाही पुसटसी कल्पना येणार नाही असे सांगताना दुर्गाताई तांबे यांच्या डोळ्यात अश्रू येऊन त्या भावूक झाल्या. अशा नराधमांना भर चौकात जीवंत जाळा अशी संतप्त प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली.
adminuniquemarathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!