वसुंधरा अभियानात तालुक्यातील चार ग्रामपंचायतींना चार कोटींची बक्षीसे
राज्यात संगमनेर तालुक्याचा विक्रम
संगमनेर ( प्रतिनिधी ) ः राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्यावतीने राबविण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत उच्चतम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थासाठीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यात संगमनेर तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींनी चार कोटी रूपयाचे बक्षिसे प्राप्त करत राज्यात विक्रम प्रस्थापित केला आहे. एकाच तालुक्याला मिळालेली ही सर्वाधिक बक्षिस संख्या मानली जात आहे.
राज्य सरकारच्यावतीने पृथ्वी,वायू,जल,अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान 4.0 हे अभियान 1 एप्रिल 2023 ते 31 मे 2024 या कालावधीकरीता राबवण्यात आले. या अभियानात राज्यातील 414 नागरी स्थानिक संस्था आणि 22 हजार 218 ग्रामपंचायती अशा एकूण 22 हजार 632 संस्थानी सहभाग नोंदवला होता. यात तीन गटात संस्थाचे त्रयस्थ यंत्रणेमार्फत डेस्कटॉप व फिल्ड मूल्यमापन करण्यात आले. अमृत गटासाठी 11 हजार 600 गुण, नगर परिषदा व नगर पंचायतीसाठी 11 हजार 400 व ग्रामपंचायत गटासाठी 11 हजार 600 गुणांचे मूल्यमापन करण्यात आले. 10 हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गटात घुलेवाडी ग्रामपंचायतीने राज्यस्तरावर व्दितीय क्रमांक प्राप्त केला आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीला दिड कोटी रूपयाचे बक्षिस प्राप्त होणार आहे. भूमी थीमटीकमध्ये घुलेवाडी ग्रामपंचायतीनेच राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळवत 75 लाखाचे बक्षिस प्राप्त केले आहे. नाशिक विभाग स्तरावरील गुंजाळवाडी ग्रामपंचातीला दहावा गुणानुक्रम प्राप्त झाला असून, पंधरा लाखाचे बक्षिस प्राप्त होणार आहे. पाच ते दहा हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीत विभाग स्तरावर धांदरफळ बुद्रुक ग्रामपंचायतीने १५ व्या क्रमांकाचे पंधरा लाख रूपयाचे बक्षिस प्राप्त केले आहे. अडीच ते पाच हजार लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीत राज्यस्तर उत्तेजनार्थ पारितोषीक खांडगाव ग्रामपंचायतीस जाहीर झाले असून त्याकरीता पंधरा लाख रूपयाचे बक्षिस मिळणार आहे. नाशिक विभागात पेमगिरी व चिंचोली गुरव ग्रामपंचायतीना पंधरा लाखाचे बक्षिसे जाहीर झाली आहेत. दिड ते अडीच हजार लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीमध्ये लोहारे ग्रामपंचायतीने विभाग स्तरावर क्रमांक प्राप्त करत पंधरा लाखाचे बक्षिसे प्राप्त केले आहे. तसेच दिड हजारापेक्षा कमी लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीत विभाग स्तरावर चौरकोठे ग्रामपंचायतीने पंधरा लाखाचे बक्षिस मिळवले आहे. तिगाव ग्रामपंचायतीने राज्यस्तरावरील 50 लाख रूपयाचे तिसरे बक्षिस प्राप्त केले आहे.
सर्वोत्तम कामगिरी करणारे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यात अहमदनगर जिल्ह्याने व्दितीय स्थान प्राप्त केले आहे. तर नगरपरिषदेचा विचार करता संगमनेर नगरपालिकेला राज्य स्तरावर उत्तेजनार्थ बक्षिस मिळाले आहे. विभाग स्तरावर नाशिक विभागात जळगाव जिल्हा परिषदेने सर्वोत्तम कामगिरी केली आहे.
——————————
चौकट ः हे सांघिक यश ः नागणे
राज्यात संगमनेर तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीनी विविध स्तरावर क्रमांक प्राप्त करत सुमारे चार कोटी रूपयाची बक्षिसे प्राप्त केली आहेत. वसुंधरेच्या संवर्धनामध्ये आपला वाटा तालुक्यातील ग्रामपंचायतीने उचललेला असून पर्यावरणपूरक काम करण्याची चळवळ तालुक्यात तयार झाली आहे. हे यश पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक पातळीवर ग्रामपंचायातीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक व पंचायत समितीचे कृषी अधिकारी वाळीबा उघडे यांच्या योगदानातून प्राप्त झाले आहे. हे यश सांघिक स्वरूपाचे आहे. यासाठी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांचे मार्गदर्शन लाभले. यापुढेही राज्य स्तरावरील विविध स्पर्धामध्ये सहभाग घेऊन अधिकाधिक चांगली बक्षिसे मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहू. सर्वाधिक बक्षिसे मिळाल्याने आमचा आनंद व्दिगुणीत झाला आहे.
अनिल नागणे प्रशासक तथा गटविकास अधिकारी संगमनेर