संगमनेर महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय युवक महोत्सव – जल्लोष २०२४ चे शानदार आयोजन
संगमनेर महाविद्यालयाला मिळाला आयोजनाचा बहुमान
———————————————————
संगमनेर ( प्रतिनिधी ) ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ व संगमनेर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठस्तरीय आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव- जल्लोष-२०२४ चे भव्य आयोजन रविवार ( ता. २९ ) रोजी करण्यात आले आहे. या युवक महोत्सवामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिक्षेत्रातील पुणे शहर, पुणे ग्रामीण, अहमदनगर, नाशिक अशा विविध महाविद्यालयातून जवळपास दिड हजार स्पर्धक विद्यार्थी २७ कला प्रकारांमध्ये सहभाग नोंदवून आपली कला सादर करणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भव्य युवक महोत्सवाच्या आयोजनाचा बहुमान संगमनेर महाविद्यालयाला प्राप्त झाला आहे.
या युवक महोत्सवामध्ये पुणे विद्यापीठातील कला, वाणिज्य व विज्ञान तसेच इंजिनिअरींग, व्यवस्थापन संस्था, फार्मसी महाविद्यालयांचे बहुसंख्येने विद्यार्थी व विद्यार्थीनी संगीत, नृत्य, ललित कला, थिएटर, साहित्यिक या पाच मुख्य कला प्रकारांतील २७ स्पर्धेमधील जिल्हास्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त कलावंत विद्यार्थी सहभाग नोंदवणार आहेत.
उद्घाटन व समारोप प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, प्र.कुलगुरु डॉ. पराग काळकर, शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, शिक्षण प्रसारक संस्थेचे अन्य पदाधिकारी, विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य रविंद्र शिंगणापुरकर, डॉ. नितीन घोरपडे, डॉ. देविदास वायदंडे, डॉ. धोंडीराम पवार, डॉ. राजेंद्र विखे पाटील, डॉ. संदिप पालवे, डॉ. बागेश्री मंठाळकर, डॉ. संगीता जगताप, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. अभिजित कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सदर जल्लोष २०२४ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहित करुन अभिव्यक्ती देणारा विद्यापीठस्तरीय भव्यमंच आहे. या माध्यमातून शहर व ग्रामीण भागातील सर्व कलावंत विद्यार्थ्यांना या माध्यमातून सुवर्णसंधी प्राप्त होते. या युवक महोत्सवासाठी विद्यापीठ क्षेत्रातील अनेक विजेत्या विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी केले आहे. सदर महोत्सवाच्या आयोजनासाठी सांस्कृतिक मंडळाचे समन्वयक डॉ. जितेंद्र पाटील , डॉ. सुरेश गुडदे, डॉ. बाळासाहेब पालवे, विद्यार्थी विकास विभागाचे जिल्हा समन्वयक डॉ. प्रताप फलफले, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.दीपक गपले व महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर सहकारी परिश्रम घेत आहेत.