हिवरगाव पावसा येथे पुन्हा गौण खनिजची चोरी
वीज मंडळाच्या ठेकेदाराकडून मुरूम चोरी ; गावकऱ्यांचा विरोध

हिवरगाव पावसा येथे पुन्हा गौण खनिजची चोरी
वीज मंडळाच्या ठेकेदाराकडून मुरूम चोरी ; गावकऱ्यांचा विरोध
संगमनेर दि. ७ प्रतिनिधी
तालुक्यातील हिवरगाव पावसा परिसरात देवगाव हद्दीतील देवगड देवस्थान (देवतळे ) येथील राजरोस गौण खनिजची लूट झाली आहे. मुरूमाचा साधारण ६६ ×२0 फूट लांबी रुंदीचा ११ फूट खोलीचा एवढा मुरूमचा उपसा करण्यात आला आहे. ग्रामस्थांनी सोशल मीडियावर या संदर्भात आवाज उठवल्यानंतर महसूल प्रशासन खडबडून जागे झाले. तातडीने तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिलेल्या निर्देशानंतर रविवारी (दि ६) संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास मंडल अधिकारी आणि तलाठी यांनी सदर ठिकाणी येऊन पंचनामा केला असून वीज मंडळाच्या ठेकेदाराकडूनच मुरूम चोरी करून महसूल बुडवण्यात आला असल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गौण खानिजची चोरी होत असून महसूल विभाग जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळते. हिवरगाव पावसा परिसरात पुन्हा एकदा महसूल विभाग मेहरबान झाल्याचे पाहायला मिळाले. देवगाव येथील महावितरण कंपनीच्या 33/11 के व्ही सबस्टेशन येथील कामासाठी सदर मुरुमचा वापर झाला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संबंधित काम करणारा ठेकेदार अवैधरित्या मुरूमाचे एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्खनन केले असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी. तसेच इतर कोणत्या ठिकाणी मुरुमाची वाहतूक झाली असेल तर त्या संबंधितांवर देखील कारवाई करावी अशी मागणी देवगाव ग्रामस्थांनी केली आहे. तर एवढे मोठे उत्खनन गावातील पुढाऱ्याच्या सहकार्याने झाले असल्याचा आरोप देखील गावकरी करत आहे.
स्वराज्य सैनिक संघटनेचे अध्यक्ष माजी सैनिक प्रकाश कोटकर व इतर ग्रामस्थांनी तहसीलदार यांच्याकडे तक्रार करताना म्हटले आहे कि, ग्रामसेवक, तलाठी तसेच सरपंच यांच्यासमोर या अगोदरही असे अनेक मुद्दे मांडले. परंतु त्यांनी सोयीस्करपणे याकडे दुर्लक्ष केले. जर कार्यवाही झाली नाही तर महसूल विभाग आणि प्रशासकीय विभागाविरुद्ध वेगळे पाऊल उचलावं लागेलं. असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.
अनेक वेळा प्रशासनाच्या निदर्शनास आणून सुद्धा कार्यवाही का झाली नाही? याचा गावातील सर्व नागरिकांनी प्रशासनाला जाब विचारला पाहिजे. रस्त्यांना मुरूम टाकायला परवानगी मिळत नाही. आणि तोच गावातला मुरूम राजरोस लूट करून बाहेर टाकला जातोय. त्यामुळे संबधित ठेकेदारावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी देवगावकर करत आहेत.