संगमनेर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना धमक्या..?
विधानसभेच्या निवडणूकीत सोशल मिडीयाचा गैरवापर होत असल्याचा आरोप...
संगमनेर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना धमक्या..?
विधानसभेच्या निवडणूकीत सोशल मिडीयाचा गैरवापर होत असल्याचा आरोप….
संगमनेर ( प्रतिनिधी ) ः- शिर्डी विधानसभा मतदार संघातील आश्वी खुर्द येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावतीताई घोगरे यांच्या प्रचारसभेसाठी संगमनेर साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याची सक्ती युवा नेत्या डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केल्याचा स्क्रिन शॉटने दोन तिन दिवसांपूर्वी सोशल मिडीयावरील विविध समूहावर धुमाकुळ घातला. या इमेजमुळे मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली असून, थोरात समर्थकांनी याचे खंडन तर व विखे समर्थकांनी याचे समर्थन केल्याने खळबळ उडाली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, विधानसभा निवडणूकीच्या धामधुमीत राज्यातील राजकिय निरिक्षकांचे लक्ष शिर्डी व संगमनेर विधानसभेतील लढतीकडे लागले आहे. राज्याचे विद्यमान महसूलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावतीताई घोगरे यांची उमेदवारी तर माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात महायुतीचे शिंदे सेनेचे उमेदवार अमोल खताळ यांची उमेदवारी चर्चेत आहे. शिर्डी विधानसभा मतदार संघाची सर्व मदार संगमनेर तालुक्यातील परंतु मतदार संघ पुर्नरचनेत शिर्डी विधानसभेला जोडलेल्या २८ गावांवर आहे. त्यामुळे या गावांमध्ये विखे पाटील व घोगरे या दोन्ही उमेदवारांनी लक्ष्य केंद्रित केल्याने, प्रचाराचा धुरळा उडाला आहे. या अंतर्गत तालुक्यातील आश्वी खुर्द येथे प्रभावतीताई घोगरे यांच्या प्रचारार्थ युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांच्या उपस्थितीत बुधवार ( ता. ६ ) रोजी सायंकाळी ७ वाजता सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी संगमनेर साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचा आदेश डॉ. जयश्री थोरात यांनी दिल्याचे संगमनेर कारखाना कर्मचारी ग्रुपवर टाकलेल्या मेसेजद्वारे देण्यात आला होता. उपस्थित कर्मचाऱ्यांची प्रेझेंटी आपल्या विभागप्रमुखाकडे देण्याचे व विभागप्रमुखाने एक तासाच्या आत तो अहवाल देण्याच्या सुचना सदर संदेशात देण्यात आल्या होत्या.
या संदेशाचा स्किनशॉट संगमनेर व राहाता तालुक्यातील विविध व्हॉटसअप समूहांवर व्हायरल करीत विखे पाटील समर्थकांनी संगमनेर तालुक्यातील कामगारांवर असलेली दहशत अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला होता. विविध समूहांवर फिरणाऱ्या या इमेजने चांगलीच खळबळ माजवली. तर थोरात समर्थक कार्यकर्त्यांनी लागलीच या आरोपाचे खंडन करताना संगमनेर साखर कारखाना कर्मचाऱ्यांचा असा कोणताही व्हॉटसअप ग्रुप अस्तित्वात असल्याच्या गोष्टीचे जोरदार खंडन केले आहे. असा कोणताही ग्रुप अस्तित्वात नसताना केवळ थोरात यांची बदनामी करण्यासाठी बनावट ग्रुप तयार करुन त्याद्वारे फेक बातम्या प्रसारित करीत असल्याचे सांगत, विरोधकांची वैचारिक पातळी घसरल्याचे मेसेज टाकले. हा ग्रुप खरा की बनावट, त्यावरी संदेशही खरा की खोटा हा संशोधनाचा विषय असला तरी, अशा प्रकारे सोशल मिडीयाचा गैरवापर सुरु असल्याची चर्चाही या निमित्ताने रंगली आहे. यातून आपापल्या उमेदवारांचा खरंच प्रचार होतो आहे की केवळ बदनामी यावरही विचार करण्याची वेळ आली आहे.