लग्नानंतर पहिल्या मुळाला गेली परत आलीच नाही…
सुमारे 6 लाखाला चुना लावून नवरी पळाली....
लग्नानंतर पहिल्या मुळाला गेली परत आलीच नाही...
सुमारे 6 लाखाला चुना लावून नवरी पळाली….
संगमनेर /प्रतिनिधी –
मुलाचे लग्न जमत नसल्याने हतबल झालेल्या बापाची चुलत सासऱ्याच्या अमिषाला बळी पडून सुमारे सहा लाखाची आर्थिक फसवणूक व मुलाला नकली बायको मिळाल्याने समाजात इभ्रत गेल्याची घटना तालुक्यातील रहिमपूर येथे घडली आहे.
फिर्यादी चंद्रभान निवृत्ती शिंदे वय-59 वर्षे धंदा-शेती रा. रहीमपुर ता. संगमनेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांवर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी चंद्रभान शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हंटले आहे की, पत्नी मंदा, दोन मुले सतिष व अमोल, सुन अंजली व नातु शिवांश असे एकत्र राहावयास असुन शेतीव्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. मोठा मुलगा सतिष हा थोडा भोळसट स्वभावाचा असल्याने त्याचे लग्न जमत नव्हते, त्यामुळे आंम्ही घरचे कायम चिंतीत असायचो. त्याचे वाढते वयामुळे त्याचे लग्न व्हावे म्हणुन मी त्याचा बायोडाटा माझे चुलत सासरे पर्वत शंकर गव्हाणे रा अंजनापुर, ता- कोपरगाव यांना पाठवला.
तेंव्हा त्यांनी मला नाशिक येथे एक मुलगी आहे. चांगले स्थळ असुन आपण बघण्याचा कार्यक्रम करू असे म्हणाले. त्यानंतर मी माझा मुलगा सतिष यांस सोबत घेवुन माझा चुलत सासरे पर्वत शंकर गव्हाणे यांचेसह दिनांक 9/6/2024 रोजी नाशिक येथील मध्यस्थी संगिता वाघ (पुर्ण नाव माहीत नाही) रा- गणेश मंदीराजवळ, हिरावाडी, पंचवटी, नाशिक. या ठिकाणी त्यांचे घरी गेलो. त्यावेळी तेथे संगिता वाघ हीचे सोबत सोनल विजय पाटील रा- गणेश मंदीर जवळ सिडको नाशिक या दोघी होत्या. त्यांचेशी माझे चुलत सासरे यांनी ओळख करून दिल्यानंतर, त्यांनी मुलगा सतिष याचेसाठी मुलगी प्रियंका विजय दिवे ही दाखविली. व ही माझी मावस बहीण आहे असे तेथे असलेली सोनल विजय पाटील हीने परिचय करुन दिला. त्याठिकाणी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. मुलगी प्रियंका विजय दिवे राहणार शुभम पार्क सिडको, उत्तमनगर, नाशिक ही माझा मुलगा सतिष याला व आम्हाला पसंत पडली. तेंव्हा लग्नाच्या तिथेच बोलाचाली झाल्या.
तेंव्हा संगिता वाघ व सोनल विजय पाटील या म्हणाल्या तुम्हाला आमची प्रियंका सुन म्हणून करायची असेल तर पाच लाख रुपये द्यावे लागतील व लग्न करुन घ्यावे लागेल. तेंव्हा माझे चुलत सासरे पर्वत शंकर गव्हाणे हे देखील म्हणाले त्यांना पैसे द्यावे लागतील. माझे मुलाचे लग्न जमत नव्हते त्यामुळे त्या गोष्टीचा विचार करुन तडजोड करून चार लाख रुपये लग्न दिनांक 12/6/2024 रोजी रहीमपुर ता संगमनेर येथे आमचे घरासमोर करुन त्या दिवशी पैसे देण्याचे ठरवले. तदनंतर दिनांक 12/6/2024 रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास माझे राहते घरासमोर माझा मुलगा सतिष चंद्रभान शिंदे याचे मुलगी प्रियंका विजय दिवे हीचेशी आमचे मोजके नातेवाईक व सोनल विजय पाटील, संगिता वाघ, पर्वत शंकर गव्हाणे यांचे उपस्थितीत मोठ्या थाटामाटात लग्न लावले. लग्नात अर्धा तोळे दागिने मुलीचे अंगावर घातले व लग्नाचा खर्च असे 1 लाख 20 हजार रुपये खर्च झाला. तेंव्हा ठरल्याप्रमाणे चार लाख रुपये रक्कम रोख स्वरुपात माझे चुलत सासरे पर्वत शंकर गव्हाणे यांचे हातात संगीता वाघ व सोनल विजय पाटील यांना देण्यासाठी दिले.
त्यावेळी माझे नात्याने मेव्हणे असलेले प्रकाश विश्राम गव्हाणे रा-अंजनापुर, ता- कोपरगाव हे देखील तेथे उपस्थित होते. लग्न लागल्यानंतर ले पैसे घेवुन गेले त्यानंतर सुन प्रियंका ही आमचे घरी व्यवस्थित नांदली.
त्यानंतर दिनांक 10/7/2024 रोजी सायंकाळी 04/00 वा. चे सुमारास सोनल विजय पाटील रा- गणेश मंदीराजवळ सिडको नाशिक ही आमचे घरी रहीमपुर येथे आली व म्हणाली की, बहीण प्रियंका हीला चार ते पाच दिवसासाठी तिचे माहेरी नाशिक येथे पहील्या मुळाला घेवुन जाण्यासाठी आले आहे. तिला नंतर परत आणुन घालीन असे सांगितल्याने व प्रियंका हीचे पहीले मुळ असल्याने आम्ही प्रियंकाला सोनल विजय पाटील हीचेसोबत पाठविले. चार ते पाच दिवस झाल्यानंतर मी प्रियंका हीस फोन लावला. परंतु तिचा फोन स्वीच ऑफ येत असल्याने आम्ही तिची बहीण सोनल हीला फोन केला असता तिने प्रियंका ही आजारी असल्याचे सांगुन तिला पंधरा ते वीस दिवसांनी आणुन घालते असे सांगितले. त्यानंतर तिला पुन्हा वेळोवेळी फोन केला असता तिने काहीना काही कारणे सांगुन सुन प्रियंका हीस आणुन घालण्याचे टाळाटाळ केले. तेव्हा मी माझे चुलत सासरे पर्वत शंकर गव्हाणे यांना सांगितले असता त्यांनी पण वेळकाढुपणा करुन उडवाउडवीची उत्तरे दिले. तुम्ही आता मुलीला विसरुन जा पुन्हा फोन करु नका असे सांगुन तुम्ही आमचे नादी लागु नका नाहीतर चांगले होणार नाही नाही अशी धमकी दिली.
त्यानंतर सोनल विजय पाटील हीने तिचे फोनवरून माझा मुलगा सतिष याचे फोनवर फोन करुन तिने व संगिता वाघ हीने फोनवरून “तु आता प्रियंकाला विसरुन जा आमचे कोणी वाकडे करु शकत नाही. आंम्हाला पुन्हा कॉल करू नको. नाहीतर आम्ही काय करु शकतो ते रहीमपुरला आल्यावर दाखवतो” अशी धमकी दिली.
त्यानंतर दिनांक 10/10/2024 रोजी मी व माझा मुलगा अमोल असे नाशिक येथे सुन प्रियंका हीचेबाबत हीरावाडी, सिडको, नाशिक येथे चौकशी केली असता स्थानिक लोकांनी कळले की, संगिता वाघ, सोनल विजय पाटील, प्रियंका विजय दिवे ह्या अशाच पद्धतीने गरीब लोकांना गाठुन त्यांचेकडून पैसे घेवुन मुलींचे खोटे लग्न लावुन काही दिवसानंतर मुलीली परत आणुन त्याच मुलीचे परत दुसरीकडे पैसे घेवुन लग्न लावुन लोकांची फसवणुक करतात.
तेंव्हा आमची खात्री झाली की माझे चुलत सासरे पर्वत शंकर गव्हाणे, संगिता वाघ, सोनल विजय पाटील, प्रियंका विजय दिवे या सर्वांनी संगनमत करुन आम्हाला विश्वासात घेवुन माझा मुलगा सतिष व आमची 4 लाख रुपये रोख रक्कम लग्नाच्या बदल्यात घेवुन त्यानंतर सुन प्रियंका हीला माहेरी पहील्या मुळाला नेतो असे सांगुन आमचे घरून रहीमपुर येथुन घेवुन जावुन तिला पुन्हा नांदण्यासाठी आमचे घरी न पाठवता व लग्नाचे बदल्यात घेतलेले चार लाख रुपये परत न करता धमकी देवुन फसवणुक केली आहे. म्हणुन माझी माझे चुलत सासरे 1) पर्बत शंकर गव्हाणे रा-अंजनापुर, ता- कोपरगाव 2) प्रियंका विजय दिवे रा- शुभम पार्क सिडको उत्तमनगर नाशिक 3) सोनल विजय पाटील रा- गणेश मंदीराजवळ सिडको नाशिक 4) संगिता वाघ (पुर्ण नाव माहीत नाही) रा- गणेश मंदीराजवळ हिरावाडी पंचवटी नाशिक यांचेविरुद्ध फिर्याद आहे. असे दिलेल्या फिर्यादित म्हंटले आहे.
दरम्यान तालुका पोलीस ठाण्यात फसवणूकीसह विविध कलमांनव्ये गुन्हा करण्यात आला असून पोलीस तपास करत आहे.
पोलिसांची भूमिका संशयस्पद…
गुन्हा दाखल होऊन १९ दिवस झाले आहे असून देखील अजून आरोपी अटक नाही. कोणतीही प्राथमिक चौकशी नाही. कोणतीही नोटीस आरोपीला नाही. फिर्यादीचे साक्षीदारांचे जबाब घेतले असे पुरावे घेतले आहे ,पोलीस आरोपीस मदत करत असल्याचा आरोप फिर्यादीकडून केला जात असल्याने तालुका पोलीसांची भूमिका संशयस्पद असल्याचे बोलले जात आहे.