राज्यात 180 जागांसह महाविकास आघाडी सत्ता स्थापन करेल – आमदार थोरात
जिल्ह्यामध्ये सर्व जागा महाविकास आघाडीच्या निवडून येणार..
राज्यात 180 जागांसह महाविकास आघाडी सत्ता स्थापन करेल – आमदार थोरात
असंविधानिक भ्रष्टाचारी महायुतीला खाली खेचणे हे पहिले उद्दिष्ट – आमदार थोरात
जिल्ह्यामध्ये सर्व जागा महाविकास आघाडीच्या निवडून येणार
35 वर्षे सत्ता असून राहता तालुक्यात विकास नाही..
संगमनेर ( प्रतिनिधी ) –
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मी राज्यभर प्रचार दौरा केला. राज्यात सर्वत्र महायुती सरकार बद्दल प्रचंड राग असून निवडणुकीत महाराष्ट्रात 180 जागांसह महाविकास आघाडी सत्ता स्थापन करेल असा विश्वास व्यक्त करताना असविधानिक व भ्रष्टाचारी महायुती सरकारला सत्तेतून खाली खेचणे हे पहिले उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
संगमनेर मधील सुदर्शन निवासस्थानी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी समवेत युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात उपस्थित होत्या.
याप्रसंगी पुढे बोलताना आमदार थोरात म्हणाले की, राज्यामध्ये महागाई ,बेरोजगारी, प्रचंड वाढली आहे.शेतीमालाला भाव नाही. दुधाला भाव नाही. इंधन दरवाढ, ठप्प झालेला विकास यामुळे जनतेच्या मनात प्रचंड रोष आहे. येत्या निवडणुकीत महाविकास आघाडी 180 जागांसह विजयी होईल.
मी राज्यभर प्रचार करत असताना संगमनेर तालुक्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी अत्यंत सक्षमपणे सांभाळले आहे. संगमनेर मधून नक्कीच मोठा विजय होणार असून अहमदनगर जिल्ह्यात सर्व जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील. याचबरोबर शेजारी राहता तालुक्यामध्ये प्रचंड दहशत आणि दडपशाही आहे. 35 वर्ष एका घरात सत्ता, खासदार, मंत्री, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष असे विविध पदे असताना सुद्धा त्यांना राहता तालुक्याचा विकास करता आला नाही. नगर मनमाड रस्त्याची मोठी दुरावस्था असून यामुळे हजारो नागरिकांचे प्राण गेले आहे. साई संस्थान मधील 598 कर्मचाऱ्यांचा प्रश्न प्रलंबित आहेत. शहराचा आराखडा विकसित झालेला नाही. साई संस्थांचे सुसज्ज हॉस्पिटल असताना खाजगी 200 बेडचे हॉस्पिटल निर्माण करण्याची गरज काय. असे विचारताना साई संस्थान मोठे शैक्षणिक संकुल उभे करू शकले असते मात्र तेथे ते होऊ दिले जात नाही. संस्थांच्या कारभारामध्ये बेकायदेशीरपणे हस्तक्षेप केला जातो आहे.
मूळचे भाजपचे कार्यकर्ते यांची दुरावस्था करून टाकली आहे. शिर्डीच्या अनेक जमिनींवर आरक्षण टाकून जनतेला वेठीस धरले आहे. शिर्डीमध्ये अवैध धंदे, गुन्हेगारी वाढली आहे. हे सर्व थांबवायचे असेल तर सर्वांनी आपला स्वाभिमान जिवंत ठेवून प्रभावती घोगरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे.
संगमनेर मध्ये ज्याप्रमाणे शांतता सुव्यवस्था आणि विकास आहे. तसे काम राहता तालुक्यात करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. राहता तालुक्यातील प्रश्नांसाठी वेळेला रस्त्यावर उतरायची वेळ आली तरी मी तयार आहे.
ही राहता तालुक्यातील जनतेच्या स्वातंत्र्याची लढाई असून सर्वांनी सहभागी होऊन सौ. घोगरे यांना विजयी करावे असे आव्हान त्यांनी केले.
आचारसंहितेच्या काळातही प्रशासन कुणाच्यातरी दबावाखाली..
यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. धरणांमध्ये चांगला पाऊस आहे असे असताना सुद्धा आमच्या तळेगाव पाणीपुरवठा योजनेसाठी पाणी दिले जात नाही. लोकप्रतिनिधी या नात्याने वारंवार मागणी करून सुद्धा प्रशासन ही मागणी टाळत आहे. राजकारणासाठी जनतेशी कोणी खेळू नये. प्रशासन कुणाच्या दबावाखाली आहे हे कळाले पाहिजे. लोकशाहीमध्ये प्रशासनाने असे एकतर्फी वागणे अत्यंत चुकीची आहे. प्रशासनाने नेहमी जनतेच्या हितासाठी काम केले पाहिजे असे ही ते म्हणाले.