संगमनेर /प्रतिनिधी-
तालुक्यातील जवळे कडलग येथील हिराबाई रामचंद्र लांडगे यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याची दुःखद घटना (बुधवार) 27 नोव्हेंबर रोजी घडली असून दशक्रिया विधी शुक्रवार (दि.6 डिसेंबर) रोजी जवळे कडलग या मूळ गावी आढळातीरी आढळेश्वर मंदिराजवळ होणार आहे. त्यांचे वय 93 वर्षे होते.
2 जुलै 1932 साली हिराबाईंचा जन्म तालुक्यातील धांदरफळ येथे झाला होता. माजी मंत्री बी.जे.खताळ पाटील यांच्या त्या भगिनी होत्या.
संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील एक व्यापारी, व्यावसायिक, एक प्रगत शेतकरी तसेच सामाजिक कार्यकर्त्या, धडाडीच्या नेत्या म्हणून त्याची विशेष ओळख होती. कै. रामचंद्र पांडुरंग लांडगे यांच्या त्या धर्मपत्नी होत्या. रामचंद्र लांडगे हे स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वातंत्र्य सेनानी होते. परंतु देशाची सेवा ही कुठल्याही लाभासाठी केली नाही. या निस्वार्थी देशप्रेमापोटी स्वतःची शासन दरबारी स्वातंत्र्य सेनानी म्हणून नोंद केली नाही. स्वातंत्र्य सेनानी म्हणून सर्व लाभ नाकारले.
हिराबाई लांडगे तश्या मुळच्या वडगाव लांडगे या गावच्या होत्या. हिराबाई लांडगे या कॉम्रेड कामुनिस्ट विचारांच्या चळवळीचे धडाडीचे आदर्श ज्वलंत व्यक्तिमत्व होते. तालुक्यातून 12 वर्षे त्या पंचायत समिती सदस्य म्हणून कार्यरत होत्या. स्वभावाने
मायाळू, मनाने तेवढ्याच कणखर, संघर्षमय, स्वाभिमानी असलेल्या हिराबाईं लोकांच्या समस्या सोडवण्यात अग्रेसर होत्या. त्यांचे शालेय शिक्षण धांदरफळ येथेच झाले होते. स्त्री ज्या काळात शिक्षणापासून पूर्णपणे वंचित होती त्या 1940-50 च्या दशकात हिराबाईंचे शिक्षण 7 वी इतके झाले होते.
पती रामचंद्र लांडगे यांच्या खांद्याला खांदा लावून शेतीच्या क्षेत्रात नवनवे प्रयोग त्यांनी केले. धान्य कडधान्य, भाजीपाला उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन व तसेच पाणी बचतीसाठी तालुक्यातील पहिली ठिबक योजना शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरले. आढळा नदीवरून त्या काळच्या प्रचंड उंच व लांब पाईपलाईन केली. त्यासाठी बंधू माजी मंत्री बी.जे. खताळ पाटील व नंदावा विठ्ठल हासे यांचे मार्गदर्शन लाभले. ते इतर शेतकऱ्यांसाठी एक आदर्श पॅटर्न ठरली.
बचत गटाची संकल्पना ही आता दिसून येते परंतु त्या काळात हिराबाई लांडगे यांनी महिला सशक्तिकरणासाठी त्यांच्या कार्यकाळात 40 बचत गटांपेक्षा जास्त बचत गट चालवले होते. महिलांवरील अत्याचारांवर आवाज उठवत 75 च्या दशकात त्यांनी अनेक महिलांचे संसार वाचवले. स्त्री मुक्ती मोर्चाची चळवळ महाराष्ट्रामध्ये कॉम्रेड डांगे यांच्या नेतृत्वाखाली केली. त्या काळी स्त्रियांच्या हक्कासाठी शिक्षण राजकारण, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्या संदर्भात ज्या चळवळ झाल्या त्यात माजी आमदार दत्ताजी देशमुख, कॉम्रेड रामचंद लांडगे, गंगुबाई देशमुख, द्रौपदाबाई कडलग यांच्या सोबत मुंबई मंत्रालय येथे महिलांच्या मोर्चाचे संगमनेर अकोले तालुक्याचे नेतृत्व हिराबाई लांडगे यांनी केले.
त्या एक कुशल संघटक व गरिबांची एक प्रकारे मसीया होती.
राजकीय, सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक चाड लाभलेल्या हिराबाई लांडगे पारंपरिक बरोबरच आधुनिक विचारांच्या होत्या. त्या काळात सोशल मीडिया हे प्रसिद्धी माध्यम नसल्याकरणाने एवढे मोठे कर्तृत्व असून देखील हे व्यक्तिमत्व प्रसिद्धी झोतपासून दूर राहिले.
त्यांच्या निधनाने लांडगे कुटुंबावर शोककळा आहे. त्याच्या पश्च्यात गोकुळ, दिलीप, वैभव लांडगे अशी तीन मुले तर मंगल जगन्नाथ काळे, मीना सुधाकर दौंड, उज्वला मधुकर शिंदे, शिला भरत पाटील, शर्मिला बाळासाहेब आंबरे अश्या पाच मुली आहेत. सर्व मुले मुली नातवंडे उच्च शिक्षित असून त्यातील काही अमेरिकेत नामांकित कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहे. मोठा मुलगा गोकुळ हा जवळे कडलगचा प्रगतशील शेतकरी, मुलगा दिलीप केमिकल इंजिनियर असून नामांकित केमिकलं कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहे. तर वैभव लांडगे भाजपचे विद्यमान तालुका अध्यक्ष आहेत. शर्मिला आंबरे ह्या महसूल विभागात लिपिक पदावर कार्यरत आहे. उज्वला शिंदे सामाजिक कार्यकर्त्यां व ज्योतिषशास्त्र विशारद आहे. शिला पाटील अमेरिकेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. मीना दौंड या औरंगाबाद सिल्लोड येथे शिक्षिका असून सिद्धेश्वर शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमन होत्या. तर मंगल काळे या पुण्यामध्ये योगा क्लासेस चालवतात. असा उच्च शिक्षित असा हा परिवार आहे.
हिराबाईंच्या जाण्याने लांडगे परिवार व आप्तस्वकी्यांनावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आमचा आधारवड हरपला असल्याचे भावना त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे.